मुरुडमधील महिला मासळी सुकवण्यात मग्न

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड परिसरातील कोळी बांधवांचे लॉकडाऊन व कोरोना काळात फार मोठे नुकसान झाले आहे. सतत वादळ, अवेळी पाऊस, निसर्ग वादळ यामुळे मासेमारीचा कालावधी कमी झाला आहे. प्रमुख मासेमारीच्या हंगामात वादळ आल्याने कोळीबांधव नाराज होते. ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला खरी सुरूवात झाली असून कोळंबी मोठ्या प्रमाणात मिळाल्याने सद्य महिला कोळंबीचे सोडे बनवून ऑक्टोबरच्या कडक उन्हात सुकवण्याच्या कामात मग्न असलेल्या दिसत आहेत.
मुरुड-जंजिरा येथे दिवाळी हंगामांत पर्यटक मोठ्या संख्येने समुद्रकिनार्‍याच्या आनंद घेण्यासाठी येतात व जाताना खास वर्षभर पुरेल एवढी ताजी सुकी मासळी खरेदी करतात. त्यामुळे सुक्या मासळीला मागणी वाढते. म्हणून महिला आतापासून सुक्या मासळीचा साठा करतात. कोळंबी साल काढून उलट्या टोपल्यांवर क्रमात लावून कडक उन्हात सुकवण्याचे काम सतत चालू असते. सुके बोंबील, सुके सुरमई, पापलेट याला मोठी मागणी असते.

वादळ पाऊस व खराब हवामानामुळे मच्छिमारांना सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. महिलांना सोडे व मासळी सुकवण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावर सुकवावी लागते. त्यामुळे समुद्रालगत काँक्रिटीकरणाचे पटांगणची सोय करावी अशी मागणी मच्छिमार संघाकडून होत आहे.
विजय गिदी, कोळी मच्छिमार.

Exit mobile version