आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर पिस्तूल प्रकारात भारताला पलकने सुवर्णपदक पटकावून दिले. तर, ईशा सिंगने रौप्यपदक पटकावलं आहे. भारताचं हे आठवं सुवर्णपदक आहे. आशियाई स्पर्धेत भारताने आतापर्यंत 30 पदकांची कमाई केली आहे.
भारताला 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीच्या वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदकासह रौप्यपदकही मिळालं आहे. 17 वर्षांच्या पलकचे सुवर्णपदक पटकावलं. तर 18 वर्षीय ईशा सिंगने रौप्य पदक जिंकलं. यामुळे महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला सुवर्णपदक आणि रौप्यपदक दोन्ही मिळाले आहेत. यासोबतच पाकिस्तानी खेळाडूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
ईशाचा पदकांचा चौकार
या स्पर्धेत ईशा सिंगने भारतासाठी चार पदके जिंकली आहेत. ईशाने 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. यापूर्वी ईशाने 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं.
पदकांची लयलूट
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताने दमदार सुरुवात केली आहे. नेमबाजांनी दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. यासोबतच नेमबाजीतच दोन रौप्यपदकेही पटकावली आहेत. मात्र, पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारतीय जोडीचा पराभव झाला. भारताच्या नावावर आतापर्यंतच्या खेळांमध्ये 8 सुवर्णांसह एकूण 30 पदके आहेत.