पाणीटंचाईच्या प्रश्नावर ऐन निवडणुकीत संताप उसळला
| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील बाहे गावात पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येमुळे महिलांनी येत्या 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. पाणीप्रश्न तातडीने सोडवला नाही, तर मतदान न करण्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय महिलांनी जाहीर केला आहे.
याबाबत माहिती देताना एकता ग्रामसंघ महिला बचतगटाच्या अध्यक्षा रिया देवकर यांनी सांगितले की, 2014-15 मध्ये गावातील नळपाणी पुरवठा योजना आणि ‘हर घर जल’ योजनेची कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले. मात्र प्रत्यक्षात आजतागायत गावातील महिलांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळालेली नाही. पाण्यासाठी महिलांना मोठी पायपीट करावी लागते.
या प्रश्नाबाबत पंचायत समिती तसेच देवकान्हे ग्रामपंचायतीकडे यापूर्वी अनेकदा लेखी तक्रारी देण्यात आल्या. तरीही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने समस्या कायम आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, 3 फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकाऱ्यांनाही पुन्हा लेखी निवेदन देण्यात आले आहे. “दोन दिवसांत ठोस निर्णय झाला नाही, तर आम्ही मतदानावर पूर्ण बहिष्कार टाकू. तसेच पाणीप्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणालाही बसू,” असा इशारा महिलांनी दिला आहे. पाणीपुरवठ्याच्या मूलभूत प्रश्नावर प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी गावातील महिलांकडून होत आहे.







