| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमधील दहा तरुणांनी ई-रिक्षाचे सारथ्य करण्यासाठी रिक्षाचालक परवाना राज्य परिवहन विभागाकडून मिळविला आहे. त्यात माथेरान मधील कविता बल्लाळ या रिक्षाचालक परवाना मिळविणार्या पहिल्या महिला रिक्षाचालक बनल्या आहेत.
माथेरानमध्ये वाहतुकीचे नवीन साधन म्हणून ई-रिक्षा सुरु होण्याची शक्यता आहे. हातरिक्षा मध्ये माणसांना बसवून त्या ओढण्याची अमानवी प्रथा बंद करावी आणि पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालविण्यात याव्यात अशी मागणी सर्वोच्य न्यायालयाने मागणी केली होती. न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला माथेरानमध्ये पर्यावरण पूरक ई-रिक्षा यांचा पायलट प्रकल्प 5 डिसेंबर ते 4 मार्च या कालावधीत राबविला गेला होता. त्यावेळी शासनाने मंजूर केलेल्या सात ई-रिक्षा चालविण्यासाठी नेरळ येथून प्रशिक्षित रिक्षाचालक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. मात्र या काळात ई-रिक्षा पुढेही सुरु ठेवण्याचा निर्णय सर्वोच्य न्यायालयाने घेतल्यास त्या ई-रिक्षा चालविण्याचा परवाना हातरिक्षा ओढणारे यांना मिळू शकतो, अशी शक्यता असल्याने माथेरान मधील अनेकांनी रिक्षाचालक होण्यासाठी कर्जत येथे प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला होता.
हातरिक्षाचे परवाने असलेले तरुण यांनी कर्जत येथे जाऊन रिक्षा चालविण्याचा प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला होता. माथेरान येथून कर्जत येथे दररोज जाऊन अनुपम मोटार ट्रेनिंग स्कुल मध्ये माथेरानच्या हातरिक्षा चालकांना गेल्या दोन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्या सर्व तरुणांनी रिक्षा चालक म्हणून आरटीओॉची परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्याबद्दल राजू गायकवाड,दिलीप कदम, अंबालाल वाघेला, क्षय वैद्य, मूर्तुझा माथेरानवाला, कन्हैया खेर, संजय भोसले, शैलेश भोसले, संतोष भोसले आणि कविता बल्लाळ या सर्वांना आरटीओ कार्यालयाने परवाना दिला आहे. तर माथेरान मधील पहिल्या महिला रिक्षा चालक म्हणून कविता बल्लाळ यांनी परवाना मिळविला आहे. त्यानुसार आता माथेरान मधील तरुणांच्या हाती ई-रिक्षा येण्याची शक्यता असून सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयावर ते अवलंबून आहे.