महिलांची एसटीला पसंती

दोन दिवसांत हजारोंनी घेतला अर्ध्या तिकिटाचा लाभ

| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड बस आगारामधून दोन दिवसांत 2609 महिलांनी एसटी प्रवास करुन महिला सन्मान योजनेचा लाभ घेतला. महाराष्ट्र राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी 17 मार्चपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यास सुरुवात करण्यात आली. मुरुड-जंजिरा बस आगारामधून मुंबई, पुणे, रोहा, कल्याण, बोरवली, शिर्डी आदींसह सुटणार्‍या व येणार्‍या एसटीमधून प्रवास करणार्‍या महिलांना तिकिटात 50टक्के सवलत देऊन महिला सन्मान योजनेचा लाभ देण्यात आला.

याआधीही 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍या ज्येष्ठांना बस प्रवासात 50 टक्के सवलत चालू आहे. 75 वर्षांपेक्षा जास्त असणार्‍यांना एसटीने मोफत प्रवास ही सवलत चालू आहे, त्याबरोबर विद्यार्थ्यांनाही शाळेत जाताना सवलत दिली जाते. शाळेत जाणार्‍या पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलींना तर प्रवास मोफत आहे.आता नव्याने महिलांसाठी एसटी प्रवासामध्ये 50 टक्के सवलत ही महिला सन्मान योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ दोन दिवसात 2609 महिलांनी एसटी प्रवास करुन घेतला आहे, अशी माहिती मुरुड आगार व्यवस्थापक नीता जगताप यांनी दिली.

Exit mobile version