महिला सुरक्षित, तर घर सुरक्षित; जयपाल पाटील यांचे मार्गदर्शन

| पनवेल | प्रतिनिधी |

आपल्या घरातील सासू, सुना सुरक्षित राहिल्या म्हणजे संपूर्ण कुटुंब सुरक्षित, घर सुरक्षित, आणि देश सुरक्षित राहतो. यासाठी घरातील सर्व सदस्यांनी आपल्या स्वयंपाकघरात गॅस सिलिंडररुपी असणार्‍या बॉम्बबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील यांनी केले. पनवेल तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायतीच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन व हळदीकुंकू कार्यक्रमात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे माजी राम भोईर, रायगड भूषण जयपाल पाटील, सरपंच वैशाली भोईर, उपसरपंच प्रीती गायकवाड, ग्रामसेवक गणेश पाटील, मुख्याध्यापिका सोनवणे मॅडम, प्रशांत गायकवाड, समाजसेवक, ग्रामपंचायत महिला सदस्य आदी उपस्थित होते. प्रारंभी जयपाल पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी व सावित्रीबाई फुले यांच्या तसबिरींचे पूजन करण्यात आले. तर सरपंच वैशाली भोईर यांनी श्रीफळ वाढविले. पाटील यांच्या हस्ते सरपंच वैशाली भोईर व उपसरपंच प्रिती गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जयपाल पाटील सन्मान यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ माजी जि. प. सदस्य राम भोईर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपस्थित महिलांना व मुलींना घरातील विजेची उपकरणे, गिझर, हीटर, साप व विंचू दंशाच्या वेळी काळजी, हमरस्त्यावरून शाळेत येणार्‍या लहान मुलींना सुरक्षेसाठी एकमेकांचे हात पकडून कसे घ्यायचे याचे प्रात्यिक्षक, महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचे 112 क्रमांकास पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना फोन लावताच पनवेल शहर पोलीस ठाण्यावरून बीट अंमलदार पोहोचले. अपघात झाल्यावर 102 चा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक देताना डॉ. प्रियांका कांबळे व पायलट हे अर्ध्या तासात पोहोचले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत परिसरातील गावांमधून 430 महिला सुधागड एज्युकेशन सोसायटीतील 8 वी ते 10वीच्या मुली, रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सातवीच्या मुली उपस्थित होत्या. सर्व महिलांना हळदी कुंकवाचे वाण सरपंच वैशाली भोईर, उपसरपंच प्रिती गायकवाड व महिला सदस्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील गुरुजी यांनी, तर प्रदर्शन सरपंच वैशाली भोईर यांनी मानले.

Exit mobile version