महिलांनी ’भयमुक्त ’व्हावे

| पेण | वार्ताहर |

भय वाटणे ही संपूर्णतः नैसर्गिक भावना नाही. असे असते तर स्त्रियांना ज्याबद्दल भीती, दडपण, टेंशन वाटते, तेच पुरुषांनाही वाटले असते. आपल्या सामाजिकीकरणावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. गरीब व कष्टकरी बाईचे जीवन तर अनेक प्रकाराच्या बंधनात अडकलेल असतं. ‘या भयातून मुक्ती म्हणजेच आमचं खरं स्वातंत्र्य’ असे उद्गार स्री मुक्ती संघटनेच्या अलका पावनगडकर यांनी काढले. त्या अंकुर ट्रस्टमार्फत आयोजित आदिवासी महिलांच्या कार्यशाळेत बोलत होत्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील, इंटरनॅशनल जस्टीस मिशनचे श्री. केल्वीन, श्रीमती लक्ष्मी, नम्रता बारसी आदी उपस्थित होत्या. सदर कार्यशाळा महात्मा गांधी वाचनालयात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. वैशाली पाटील यांनी नैसर्गिक संसाधनांवरील अधिकार व महिलांची भूमिका याविषयी मांडणी केली. आदिवासी महिलांच्या आरोग्याबाबत निरा वीर यांनी मांडणी करताना त्याचा संबंध अन्नसुरक्षेशी जोडला. सोपान निवळकर, रूपम पाटील यांनी सामूहिक वनहक्क यावर सादरीकरण केले.

सदर कार्यशाळेची प्रस्तावना मीनल सांडे यांनी केली. सूत्रसंचालन पायल आंब्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आशिष सावंत यांनी केले. या कार्यक्रमास सीआरटीओ श्‍वेता शेट्टे, नेहा शेळके, सुजाता पाटील यांनी उपस्थिती लावून स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्यांना बक्षीस वितरण केले.

Exit mobile version