। महाड । वार्ताहर ।
जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील महिलांना मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून न ओळखता, लेक शिवबाची म्हणून ओळखली जावी. यासाठी जे-जे काही करता येईल यासाठी आपण स्वतः एक महिला म्हणून प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही शिवसेनेच्या (उबाठा) नेत्या स्नेहल जगताप यांनी दिली.
रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशन पुरस्कृत लेक शिवबाची हा भव्य दिव्य महिला संवाद मेळावा बी.एस. बुटाला सभागृहात पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण आणि बचत गटांना आर्थिक सहाय्य याबाबत माहिती देण्यात आली. बचत गटामार्फत तयार होणारे उत्पादन त्यांना उपलब्ध होणारी बाजारपेठ कशी तयार करता येईल, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत त्याला कसे आर्थिक सहाय्य देता येईल, या बाबतची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.
या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, मेघना पवार, अश्विनी घरटकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी हजारो महिलांनी मान्यवरांबरोबर संवाद साधत आपल्या अडीअडचणी सांगितल्या. महिलांचे सर्व प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास स्नेहल जगताप यांनी महिलांना दिला.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपयां पेक्षा महिलांनी स्वतःच्या कमाईतून हक्काचे पैसे कसे मिळतील याबाबत माहिती देत महिला सक्षम होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. आगामी काळात महिला बचत गटांच्या माध्यमातून पुढे येत नावलौकिक मिळवतील. यासाठी महिलांनी भविष्यातील घडामोडी ओळखून बदल केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात उपस्थित महिला वर्गाला बचतगटामधील असणार्या योजनांची पुर्ण माहिती देण्यात आली. संवाद मेळाव्याकरिता अडीच हजारपेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या.