सोन्याचे मंगळसूत्र, रोकड लंपास
। नागोठणे । प्रतिनिधी ।
तोंडाला स्कार्प लावून दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या तीन-चार महिलांमुळे नागोठण्यात दहशत निर्माण झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज बाजार पेठेत सोन्याचे मंगळसूत्र या महिलांनी चोरले होते. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी (दि.16) सायंकाळी एका वडापावच्या टपरीवर नाश्ता करण्यासाठी गेलेल्या तीन स्कार्पधारी महिलांनी टपरीवरील महिलेला गुंगारा देऊन टपरीच्या गल्ल्यातील तीन हजार रुपये लंपास केले. महिला चोरट्यांकडून दिवसाढवळ्या, लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे नागोठण्यात घबराट निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुमारे पाच दिवसांपूर्वी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नागोठणेतील छ. शिवाजी महाराज बाजारपेठेतील मीरा ज्वेलर्स या दुकानात आपले दीड तोळ्याचे (सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे) सोन्याचे मंगळसूत्र दुरुस्त करण्यासाठी नागोठण्याजवळील जांभुळटेप (ता.पेण) येथील रिया भोईर या आल्या होत्या. याचवेळी सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने तोंडाला स्कार्प लावलेल्या चार महिला या दुकानात आल्या. मंगळसूत्र दुरुस्त करण्यास वेळ लागेल, त्यामुळे थोड्या वेळाने या, असे रिया भोईर यांना ज्वेलर्स कारागिराने सांगितले. रिया भोईर यांनी मंगळसूत्र आपल्या पर्समध्ये ठेवले आणि त्यांनी दुकानातून बाहेर पडण्यास सुरुवात केली. याचदरम्यान या चारही महिलांनी रिया भोईर यांच्या पर्समधील मंगळसूत्र शिताफीने लंपास केले. या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण असून या महिला चोरट्यांना पकडण्याचे आव्हान नागोठणे पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
दुसऱ्या घटनेत नागोठणे येथील छ. शिवाजी महाराज चौकातून मच्छी मार्केटकडे जाण्याऱ्या रस्त्यालगत अनुसया शिंदे यांची वडापची टपरी आहे. शुक्रवारी (दि.16) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तीन महिला या टपरीवर नाश्ता करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी टपरीसमोर दोन स्कार्पधारी महिला तर तिसरी महिला अनुसया शिंदे यांच्या मागे उभी राहिली. तिने त्यांना बोलण्यात गुंग करून ठेवले. त्याचवेळी इतर दोन महिलांनी संधी साधून अनुसया शिंदे यांच्या टपरीच्या गल्ल्यातील तीन हजार रुपये हातचलाखीने लंपास केले आणि तिघींनी तेथून पोबारा केला.
यातील मीरा ज्वेलर्स येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मंगळसूत्र चोर महिला कैद झाल्या आहेत. नागोठण्यात दिवसाढवळ्या घडलेल्या या दोन्ही चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. या घटनांची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी नागोठण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान आपल्या आजुबाजूला व परिसरात कुणीही महिला संशयास्पदरित्या आढळून आल्यास त्वरीत नागोठणे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सपोनि सचिन कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आले आहे.
