स्वातंत्र्य युद्ध काळात महिलांचा विसर; अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे प्रतिपादन

| खोपोली | प्रतिनिधी |

स्वातंत्र्याचा इतिहास लिहिताना, स्वातंत्र्य शस्त्राविना मिळाले हे काही इतिहासकार सांगतात ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, असे प्रतिपादन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. ते दास नवमी उत्सवानिमित्त लोहाना समाज सभागृहात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांचे योगदान या विषयावर बोलत होते. यावेळी शैला बाम, नटूभाई ठक्कर, अभय तना, व्यापारी संघटनेचे नेते बाम यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सोलापूरकर यांनी स्वतंत्रपूर्व काळातील असंख्य अज्ञात स्वातंत्र्यवीरांगणाचा इतिहास शब्दरूपी प्रेक्षकांसमोर मांडला. देशभरातील कानाकोपर्‍यातील महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन हुतात्मे पत्करले. या सर्वांचा इतिहास आजच्या पिढीला माहीत होणे गरजेचे आहे. यातील अनेक विरांगणा अल्पवयीन होत्या पण लढ्यात सहभाग घेताना त्या डगमगल्या नाहीत, ब्रिटिशांच्या कैदेमध्ये असलेल्या महिलांवर तर ब्रिटिशांनी क्रूरपणे वागणूक देत असल्याच्या आठवणी सांगताना उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. 247 जण फासावर गेले, 152 जणांनी गोळ्या घेतल्या, तर अगणित वीरांनी ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून आपले जीवन संपविले. त्याची कुठेही नोंद सापडत नसल्याची धक्कादायक बाब त्यांनी व्यक्त केली.

त्याचप्रमाणे हुतात्मे पत्करले त्यांना शहीद, हुतात्मा या शब्दाने संबोधित करावे. असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर, आझाद हिंद सेनेचे सुभाष बाबू, या स्वतंत्रवीरांच्या युद्धामध्ये महिलांचाही मोठा सहभाग असल्याचे त्यांनी आठवणी जागवल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाठक यांनी केले. अ‍ॅड. मीना बाम यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले, तर आभार प्रदर्शन सौ. रानडे यांनी मानले. या शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version