महिला, तरुणांनी रोजगारासाठी पुढाकार घ्यावाः गोमणे

| राजापूर | वृत्तसंस्था |

ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यासाठी 12 वर्षांपूर्वी राजापूर तालुका युवा विकास मंडळ स्थापन करून स्वखर्चाने दोन प्रकल्प सुरू केले; मात्र तरुणांची मुंबईत नोकरी करण्याची मानसिकता असल्याने त्यांना गावात काम करण्याचा कमीपणा वाटल्याने प्रकल्प बंद पडले. आता काळ बदलला आहे. महिला, तरुणांनी रोजगारासाठी पुढाकार घेतला तर आपण पूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन राजापूर तालुका युवा विकास मंडळाचे अध्यक्ष मधुकर गोमणे यांनी पाचल येथे दिले.
काथ्या उद्योग कार्यशाळेमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुशिला पराडकर, संजीवनी रायबागकर, स्मिता सप्रे, शशीताई देवरूखकर, दर्शना जाधव यांचा सत्कार आणि सामाजिक कार्यकर्त्या धनश्री मोरे यांना जिजाऊ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गोमणे म्हणाले, लिज्जत पापड कंपनी बचतगटाच्या माध्यमातून नावारूपाला आली. आपल्याकडील बहुतेक बचतगट व्यवसाय कमी आणि कर्ज काढण्याचे काम जास्त करतात. त्याला उमेदचे सहकार्य लाभले असले तरी ही संधी उपलब्ध करून देणारे शरद मोरे यांचे श्रेय कोणीही नाकारून चालणार नाही. कॉयर बोर्ड विभागीय अधिकारी बिटलिंगू यांनी कॉयर बोर्डाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविधांगी उपक्रमांची माहिती दिली. त्यांचा फायदा घेत महिला, तरुणांनी आर्थिक सुबत्ता साधण्याचे आवाहन केले. प्रस्तावना मोरे यांनी केली.

स्वतंत्र कार्यालयासाठी प्रयत्न
भंडारी यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणाऱ्या संस्थांचे स्वागत करण्यात येत असल्याचे सांगताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार पाचल प्रभागात स्वतंत्र कार्यालय बांधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी महिलांनी प्रशिक्षण घेऊन आपला व्यवसाय निर्माण करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन केले.

चौकट

Exit mobile version