महिला आणि कुमार गट कबड्डी स्पर्धा

ओम्‌‍‍ वर्तकनगर, होतकरू, छत्रपती शिवाजी उपांत्य फेरीत

| ठाणे | वार्ताहर |

ओम्‌‍‍ वर्तकनगर, होतकरू, छत्रपती शिवाजी यांनी शिवप्रबोधन मंडळाने आयोजित केलेल्या महिला गटाच्या उपांत्य फेरीत धडक दिली. ओम्‌‍‍ वर्तकनगर विरुद्ध छत्रपती शिवाजी व रा.फ. नाईक विरुद्ध होतकरू अशा उपांत्य लढती होतील. ठाणे जिल्हा कबड्डी असो. च्या मान्यतेने ठाणे येथील स्वातंत्रवीर सावरकर मार्ग महानगर पालिका शाळा क्र.120 च्या पटांगणावर हे सामने सुरू आहेत. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ओम्‌‍‍ वर्तकनगरने जय भारत स्पोर्टस्‌‍‍ चे आव्हान 37-29 असे परतवून लावत उपांत्य फेरी गाठली.

पहिल्या सत्रात 18-10 अशी आघाडी घेणाऱ्या वर्तकनगरला दुसऱ्या सत्रात जय भारत स्पोर्टस्‌‍‍ ने विजयासाठी चांगलेच झुंजविले. शेवटी पहिल्या सत्रात घेतलेल्या आघाडीमुळे त्यांना विजयी लक्ष गाठता आले. पूजा जाधव, पूर्वा बिहारी यांच्या भक्कम बचावाने हा विजय साकारला. त्यांना चढाईत वैष्णवी साळुंखेची मोलाची साथ लाभली. जय भारत कडून दुसऱ्या सत्रात श्रेया गावडे, समृद्धी महांगडे, आकांक्षा तळेकर यांनी कडवी लढत दिली.

दुसऱ्या सामन्यात होतकरू मित्र मंडळाने अश्वमेध स्पोर्टस्‌‍‍ चा प्रतिकार 36-27 असा मोडून काढत आगेकूच केली. नंदिती बाईत, प्राजक्ता पुजारी, ऐश्वर्या राऊत यांच्या चढाई पकडीच्या खेळाच्या जोरावर मध्यांतराला 26-17 अशी आघाडी घेणाऱ्या होतकरूने नंतर सावध खेळ करीत विजय मिळविला. अश्वमेधच्या वैष्णवी चव्हाण, शीतल मगरे यांनी मध्यांतरानंतर उत्कृष्ट खेळ करीत सामन्याची रंगत वाढविली. पण विजय त्यांच्यापासून दूरच राहिला. शेवटच्या सामन्यात छत्रपती शिवाजी महाराज संघाने स्फूर्ती सेवा मंडळाचा प्रतिकार 49-29 असा सहज पाडाव करीत दिमाखात उपांत्य फेरी गाठली.

विश्रांतीला 27-17 अशी आघाडी घेणाऱ्या छत्रपतीने विश्रांतीनंतर देखील त्याच तडफेने खेळ करीत 20 गुणांच्या फरकाने सामना आपल्या बाजूने केला. चिरल कासार, नम्रता नेने, तारा देसाई, साक्षी पाटील यांच्या चढाई पकडीच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. स्फुर्तीच्या दिपाली पालांडे, नूतन चव्हाण, श्वेता कदम यांचा या सामन्यात खेळ बहरला नाही. आज या स्पर्धेला ठाणे जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष व माजी नगरसेवक कृष्णा पाटील, अहमदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव निकम, ठाण्याच्या माजी नगरसेविका कांचनताई चिंदरकर यांनी सदिच्छा भेट दिली.

Exit mobile version