महिला आशिया चषक: भारतासह अंतिम चार संघांवर शिक्कामोर्तब

। डंबुला । वृत्तसंस्था ।

महिला आशिया चषक स्पर्धेत बुधवारी (दि.24) ‘ब’ गटातील साखळी फेरीचे अखेरचे सामने झाले. त्यामुळे आता उपांत्य फेरीत प्रवेश करणार्‍या अंतिम 4 संघांवर शिक्कामोर्तब झाले आहे. उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या महिला संघांनी स्थान पक्के केले आहे.

‘अ’ गटातून भारत आणि पाकिस्तान संघांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. या गटात भारत तीन विजयांसह अव्वल क्रमांकावर राहिला, तर पाकिस्तान दोन विजय आणि एका पराभवासह दुसर्‍या क्रमांकावर राहिला. ‘ब’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यांमध्ये बांगलादेशने मलेशियालाला 114 धावांनी पराभूत केले, तर श्रीलंकेने 10 गडी राखून थायलंडला पराभूत केलं. त्यामुळे ‘ब’ गटात श्रीलंकेने तीन विजयांसह अव्वल क्रमांक मिळवला आहे, तर बांगलादेशने दोन विजय आणि एका पराभवासह दुसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. त्यामुळे आता उपांत्य फेरीत कोणाचे सामने कोणाविरुद्ध आणि कधी होणार हे समोर आले आहे.

‘अ’ गटात अव्वल क्रमांकावर राहिलेल्या भारतीय महिला संघाचा सामना ‘ब’ गटातील दुसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या बांगलादेश महिला संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना डंबुला येथे शुक्रवारी (दि.26) भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. तसेच, ‘ब’ गटात अव्वल क्रमांकावर राहिलेल्या श्रीलंकेचा सामना ‘अ’ गटात दुसर्‍या क्रमांकावर राहिलेल्या पाकिस्तानविरुद्ध शुक्रवारीच डंबुला येथे संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. या उपांत्य फेरीच्या सामन्यांत विजय मिळवणारे संघ रविवारी (दि.28) अंतिम सामन्यात आमने-सामने येतील.

Exit mobile version