| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
गणेशोत्सवाला आता उणेपुरे वीस दिवस बाकी असताना मुरुड तालुक्यातील बहुतांशी चित्रशाळांतून मूर्ती रंगकामासाठी मोठी लगबग सुरू झाली आहे. मूर्ती रंगकामात महिला देखोल मागे नसून त्यांचा ही मोठा हातभार लागत आहे. मुरुड तालुक्यात पन्नास ते साठ गणेशमूर्ती बनविणाऱ्या चित्रशाळा असून त्यातून दहा ते अकरा हजार मूर्ती तयार होत आहेत. त्यातील ऐंशी टक्के मूर्ती शाडूच्या मातीपासून बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाने घेतलेली विश्रांती व पडणाऱ्या कडक उन्हात शाडूच्या मूर्ती वाळविल्या जात आहेत.अनेक चित्रशाळांतून मात्र रंगकाम प्रारंभ झाला आहे. या वर्षी शाडूची माती, रंग साहित्य तसेच मजुरीच्या वाढत्या दरामुळे मूर्तीच्या किंमतीही दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत.
ग्रामीण भागातील तरुणांना मूर्ती बनविण्याच्या कामात फारशी रुची राहिलेली नाही.अनेकांना अशा बैठ्या कामापेक्षा झटपट जास्त व रोख पैसा मिळणारे रोजगार हवे असतात. त्यामुळे अशा व्यवसायाकडे त्यांना आकर्षित करण्यासाठी शासनाने काही उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत अनेक कारागीर व्यक्त करीत आहेत.कारागीर व मजुरदार मिळत नसल्याने शेवटी महिलांना आपल्या हाती रंगांचे ब्रश घेणे भाग पडले असल्याचे नांदगाव येथील सतिश जोशी व राजाराम ठाकूर यांनी सांगितले.