भिरा येथे महिला किसान दिवस साजरा

। माणगाव । वार्ताहर ।
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा महिला किसान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून माणगाव तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी माणगाव व एन.आर. एल.एम.विभाग पंचायत समिती, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मौजे भिरा (बहिरीची वाडी) येथे महिला किसान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास निजामपूर विभागातील 23 महिला बचतगट, ग्रामसंघ अशा एकूण 125 महिला कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. या उपस्थित महिला बचत गटांना डॉ.श्रीकांत स्वामी प्राध्यापक व प्रमुख काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व्यवस्थापन यांनी प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धन नाचणीपासून लाडू, पापड, कुरडया, भाजणीचे पीठ इत्यादी तयार करणे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. मनोज तलाठी कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र किल्ला रोहा यांनी बचत गटांसाठी कृषी पूरक उद्योग परसबागेतील भाजीपाला लागवड, कुकूटपालन व्यवसाय, हळद लागवड व प्रक्रिया याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी उपविभागीय कृषी अधिकारी रोहिणी भोसले यव तालुका कृषी अधिकारी आर.डी.पवार यांनी बचत गटांसाठी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये प्रक्रिया उद्योग व नाविन्यपूर्ण काम करणार्‍या महिला बचत गटांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य वासंती वाघमारे व पाटणुस ग्रामपंचायतचे सरपंच निलिमा निगडे, एनएलआरएम प्रभाग समन्वयक बालाजी कराळे, कृषी विभागाचे सर्व कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version