महिला प्रीमियर लीग

बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स विजेते

| मुंबई | वृत्तसंस्था |

गेल्या 16 वर्षांपासून आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याचे बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या चाहत्यांचे स्वप्न पूर्ण झाले. सांगलीच्या स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद पटकावले. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. या सामन्यात आरसीबीसमोर 114 धावांचे लक्ष्य होते, जे 2 गडी गमावून केवळ 19.3 षटकात पूर्ण केले. संघाकडून एलिस पेरीने नाबाद 35, सोफी डिव्हाईनने 32 आणि स्मृती मंधानाने 31 धावा केल्या. शिखा पांडे आणि मीनू मणी यांनी 1-1बळी घेतला. डब्ल्यूपीएलचा हा दुसरा हंगाम होता, जो आरसीबीने जिंकला आहे. मुंबई इंडियन्स पहिल्या सत्रात चॅम्पियन ठरला. दोन्ही वेळा दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

दुसरीकडे, आयपीएलमध्ये आतापर्यंत 16 हंगाम झाले आहेत आणि आरसीबी पुरुष संघाने एकदाही विजेतेपद जिंकलेले नाही. अशावेळी महिला संघाने केलेल्या या कामगिरीने विराट कोहली आणि पुरुष संघावरील दडपण वाढणार आहे. या अंतिम सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संपूर्ण संघ 18.3 षटकांत 113 धावांवरच मर्यादित राहिला. दिल्लीसाठी शेफाली वर्माने 27 चेंडूत 44 धावांची खेळी केली. तर कर्णधार मेग लॅनिंगने 23 धावा केल्या. आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने 4 आणि सोफी मोलिनेक्सने 3 बळी घेतले.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली होती. संघाने 7 षटकात एकही गडी न गमावता 64 धावा केल्या होत्या. पण इथून फिरकीपटू सोफी मोलिनक्सने कहर केला आणि पहिल्या 4 चेंडूत 3 बळी घेत आरसीबीला पुन्हा सामन्यात परत आणले. शेफाली (44) सीमारेषेवर झेलबाद झाली. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि अ‍ॅलिस कॅप्सी खाते न उघडता बाद झाल्या. सोफीने दोघांना त्रिफळाचित केले. चौथा धक्का 74 धावा झालेल्या असताना बसला. श्रेयंका पाटीलने कर्णधार मेग लॅनिंगला (23) पायचीत केले. यानंतर आशाने त्याच षटकात मारिजाने केप (8) आणि जेस जोनासेन (3) यांना परत पाठवले. ठराविक अंतराने गडी गमावल्यामुळे दिल्लीचा संघ सावरू शकला नाही आणि 113 धावांवर बाद झाला.

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर या संधीचे सोने केले. दिल्ली संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहून थेट अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने गतविजेत्या मुंबईचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर आरसीबीने अंतिम फेरीत प्रवेश केला.

Exit mobile version