। कर्जत । वार्ताहर ।
गेल्या अनेक वर्षांपासून गुंडगे गाव व परिसरात सकाळच्या वेळी पाणी पुरवठा नियमित केला जात होता. परंतु, कर्जत नगरपरिषदेने कोणत्याही प्रकारची सुचना न देता अचानकपणे पाणी सोडण्याच्या वेळेत बदल केला. पाणी दुपारच्या वेळेत कधीही सोडले जाते. त्यामुळे महिलांना दिवसभरामध्ये बाहेरील दुसरी कोणतीही कामे करता येत नाही. दिवसभर पाण्याची वाट पाहण्यात वेळ जात आहे. कमी दाबाने पाणी येणे, कमी वेळ पाणी सोडणे. यामुळे गुंडगे परिसरातील महिला अगदी हैराण झाल्या आहे. या विरोधात कर्जत नगरपरिषद प्रशासन तसेच पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यांना वेळो वेळी तोंडी सांगून तसेच लेखी निवेदन देवून सुध्दा याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने 1 एप्रिलपासून पाणी प्रश्न संघर्ष समिती गुंडगे येथील महिलांच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज चौक गुंडगे येथे बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात होणार आहे.
कर्जत नगर परिषदेने नेहमीच गुंडगे गाव तसेच परिसरातील नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांकडे कानाडोळा केला आहे. मग तो आरोग्याचा प्रश्न असो, अंतर्गत रस्त्याचा प्रश्न असो, स्वच्छतेचा प्रश्न असो, उद्यानांचा प्रश्न असो किंवा पाण्याचा प्रश्न असो. हे प्रश्न सोडविण्यात नगर परिषद प्रशासनाला अपयश आले आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, गुंडगे गावाच्या डोक्यावर घनकचरा प्रकल्प बसविला आहे. तो हटविण्यासाठी सतत प्रयत्न चालू आहे. परंतु, आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर बनत चालला आहे. गुंडगे गावाला पिण्याचा पाण्याचा दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने कर्जत नगरपरिषदेच्या नळपाणी पुरवठा योजनेवर अवलंबून रहावे लागत आहे. कर्जत नगर परिषद नागरिकांकडून पाणीकर वसुल करते. मात्र, त्याप्रमाणे पाणी पुरवठा करत नाही. गुंडगे परिसरातील संत रोहिदास नगर, पंचशील नगर, गुंडगे ठाकूरवाडी येथील काही भागात महिलांना पाणीचं मिळत नाही. त्यामुळे महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आपले हक्क आणि अधिकार जर आपल्याला मागून मिळत नसतील तर ते हिसकावून घ्यावे लागतील अशी महिलांनी भूमिका घेतली आहे. महिला आता चूल आणि मूल सांभाळत बसणार नाही तर, ती आपल्या हक्क आणि अधिकारासाठी रस्त्यावरदेखील उतरेल असा निर्धार महिलांनी केला आहे. कर्जत नगर परिषदेचे नव्याने रुजू होणारे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण 1 एप्रिल पासून कर्जत नगर परिषदेचा कारभार स्वीकारणार असल्याने त्यांचे स्वागत गुंडगे गावातील महिला आंदोलनाने करणार असल्याने येणार्या काळात कर्जत शहरातील अनेक समस्या सोडविण्यात मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.