| कर्जत | प्रतिनिधी |
महिला दिनाचे औचित्य साधुन आयोजित केलेल्या कर्जत 40 + क्रिकेट संघटना व इलेव्हन स्टार संघ दहिवली -कर्जत आयोजित महिला शक्ती 40+ चषक स्पर्धा
दहिवली येथे यशस्वीरित्या संपन्न झाली.
दरवर्षी कर्जत 40 + क्रिकेट संघटना विविध सामाजिक संकल्पनेवर आधारित समाजासाठी एक संदेश देण्याच्या उद्देशाने स्पर्धा आयोजित करत आलेले आहोत. यावर्षी आपल्या समाजातील तसेच परिवारातील महिलांचा सन्मान म्हणून त्यांच्या नावाने ही स्पर्धा समर्पित करण्यात आली. महिला क्रिकेटला प्रोत्साहन म्हणुन स्पर्धेला सुरुवात करताना कंपनी डोलवी, पेण व कर्जत महिला संघ यांच्या बरोबर एक प्रेक्षणीय सामना आयोजित केला होता. त्यामध्ये कर्जत महिला संघाने हा सामना जिंकुन कर्जतमधील महिला व मुलींचा संघ हा काही कुठे कमी नाही हे दाखवून दिले.
स्पर्धेला कर्जत नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा पुष्पा दगडे, उपनगराध्यक्ष संतोष पाटील, नगरसेवक राजाभाऊ कोठारी, दहिवली गाव परिसर विचारमंचचे सुनील जाधव, नगरसेविका सुचिता देवेंद्र खोत, अंजली कडु, हर्षाली गायकवाड, मानसी कानिटकर, महेंद्र चंदन, प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्षा रजनी रामदास गायकवाड, माजी नगरसेविका सुवर्णा नीलधे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संघटनेतर्फे सर्व नगरसेवक नगरसेविकांचे व मान्यवरांचा यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे संघटनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे एक धाव आरोग्यासाठी व पुन्हा एकदा तारुण्याकडे तसेच खेळामधून एक पाऊल समाजासाठी म्हणुन स्पर्धेला रोख रक्कम न ठेवता फक्त आकर्षक चषक ठेवण्यात आले होते.







