वूमन्स टीम इंडिया विश्‍वविक्रम

विश्‍वचषकमध्ये 300 पेक्षा अधिक धावा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

सलामीवीर स्मृती मानधना आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या शानदार शतकी खेळीने भारताला महिला विश्‍वचषक स्पर्धेच्या इतिहासातील आपल्या सर्वोच्च धावसंख्येपर्यंत नेले.विश्‍वचषक स्पर्धेत 300 पेक्षा अधिक धावा करणारा भारतीय संघ आता सहाव्या क्रमांकावर आला आहे. न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्‍वचषक 2022 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 8 बाद 317 धावा केल्या. यास्तिका भाटियाने आक्रमक सुरुवात केल्यानंतर स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी शतकी खेळी करत चौथ्या विकेटसाठी 184 धावांची भागीदारी केली. एकदिवसीय विश्‍वचषकात भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधीची सर्वोच्च धावसंख्या 50 षटकात 6 बाद 284 होती, जी 31 जानेवारी 2013 रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच केली होती. विशेष म्हणजे तेव्हाही भारतीय संघाचं नेतृत्व मिताली राजच्याच हाती होतं. भारताने हा सामना 105 धावांनी जिंकला होता.

भारत सहावा देश
महिला विश्‍वचषक स्पर्धेत भारताने प्रथमच 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. महिला विश्‍वचषकात 300 पेक्षा अधिक धावा करणारा भारत जगातील सहावा संघ ठरला आहे. भारतापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांनी महिला विश्‍वचषकात 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या संघाने पाच वेळा, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संघाने 2 वेळा हा पराक्रम केला आहे. या सामन्यात स्मृती मानधनाने 119 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 123 धावांची स्फोटक खेळी केली. त्याच वेळी, हरमनप्रीत कौरने 107 चेंडूंच्या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार ठोकत, 109 धावा करून दमदार साथ दिली. स्मृती मंधानाचे हे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाचवे शतक आहे, तर हरमनप्रीत कौरचे हे चौथे शतक आहे. 2017 च्या विश्‍वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावल्यानंतर हरमनप्रीत कौरची ही पहिली शतकी खेळी आहे.

स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत व्यतिरिक्त यास्तिका भाटियाने भारताकडून 21 चेंडूत 31 धावांची जलद खेळी केली. यामुळे भारताची सुरुवात चांगली झाली. तिने स्मृतीसोबत 6.3 षटकांत पहिल्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. तर, मिताली राज (5) आणि दीप्ती शर्मा (15) या लवकर बाद झाल्या. एका वेळी भारताची धावसंख्या 13.5 षटकांत 3 बाद 78 अशी झाली होती. यानंतर स्मृती आणि हरमनप्रीत यांनी चौथ्या विकेटसाठी 28.4 षटकांत (116 चेंडू) 184 धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजसाठी अनिसा मोहम्मद ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 59 धावांत दोन गडी बाद केले. हेली मॅथ्यूज (1/65), शकीरा सेलमन (1/41), डिआंड्रा डॉटिन (1/32) आणि आलिया अ‍ॅलेन (1/26) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Exit mobile version