दरड पडलेल्या जागेवर रूळ बदलण्याचे काम सुरु

। नेरळ । वार्ताहर ।
जुलै महिन्यात जोरदार पावसामध्ये नेरळ-माथेरान घाट सेक्शन मधील रेल्वे रुळावर महाकाय दरड कोसळली होती. ती दरड हटवून दरडीमुळे नुकसान झालेले रूळ काढून त्याजागी रूळ बदलण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे.
18 जुलै ते 23 जुलै यादरम्यान माथेरानमध्ये 1157 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामध्ये वॉटरपाईप स्थानकाच्या वरच्या बाजुला 134 एनएम येथे महाकाय दरड कोसळली.पाऊस शांत झाल्यानंतर मध्य रेल्वेने तात्काळ ठेकेदाराकरवी दरड हटविण्याचे काम सुरू केले. पण एकबाजूला डोंगर आणि एका बाजूला दरी यामुळे सामान नेण्यासाठी अडचणी येत होत्या त्याच्यावर मात करत रेल्वेने ठेकेदाराच्या माध्यमातून दरड हटविण्याचे काम सुरू केले. दरडीमध्ये प्रामुख्याने मोठे काळे दगड, गोटा दगड तसेच चिकट माती याचा समावेश असल्याने या रेल्वे रुळावरील दरड हटविण्यासाठी तब्बल दोन महिने लागले. आता ही दरड हटवून रेल्वेचा मार्ग मोकळा केला आहे.
पण दरडीमधून मोठे दगड रुळावर पडल्याने रूळ खराब झाले होते.त्या कामास सुरुवात झाली असून रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी कसलीही तमा न बाळगता हे काम युद्धपातळीवर करत आहेत. नेरळ-माथेरान मिनिट्रेन सेवेला विलंब हा जोरदार पावसामुळे काही ठिकाणी दरडी पडल्या होत्या तर काही ठिकाणी रुळाखालाची माती वाहून गेली त्यामुळे काही ठिकाणी झुलता पूल स्थितीत आहेत. ही सर्व कामे उरकण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.त्यामुळे दरवर्षी 15 ऑक्टोबरला सुरू होणार्‍या मिनिट्रेनसाठी जे पर्यटक नेरळ-माथेरान मिनिट्रेनची वाट पाहत आहेत.त्यांना काही काळ धीर धरावा लागणार आहे.

Exit mobile version