महावितरण कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला

सुरक्षा साहित्याविनाच करावे लागतेय काम

| अलिबाग | प्रमोद जाधव |

विजेच्या खांबावर काम करीत असताना शॉक लागून एका वायरमनचा हकनाक बळी गेल्याची घटना ताजी असतानाच, बंद झालेली विद्युत सेवा सुरळीत करताना सुरक्षेच्या साहित्याविनाच कर्मचारी काम करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांची सुरक्षा अक्षरशः टांगणीला असल्याचे उघड झाले आहे. मात्र, सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सुरक्षाविषयक साधने पुरविली जात असल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र विद्युत कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा साधनांशिवाय वीजपुरवठ्याविषयीची कामे करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातदेखील खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात महावितरणचे जाळे पसरले आहे. ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी महावितरण कंपनीमार्फत कायम व कंत्राटी स्वरुपात कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यात 1 हजार 900 कर्मचारी असून, त्यामध्ये 1 हजार 100 कर्मचारी लाईनमन म्हणून काम करणारे आहेत.

वीजपुरवठा खंडित झाल्यावर हे कर्मचारी रात्रीचा दिवस करून काम करतात. त्यावेळी फक्त ग्राहकांना चांगली सेवा कशी मिळेल, याकडे ते लक्ष देत असतात. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना सुरक्षेच्या साहित्यांचा पुरवठा केला असल्याचा दावा महावितरण कंपनीकडून करण्यात आला आहे. मात्र, हा दावा कितपत खरा आहे, याबाबत अनेकांना सांशकता निर्माण झाली आहे. बिघाडलेल्या तारांची दुरुस्ती कर्मचारी सुरक्षेच्या साहित्याविनाच असल्याचे अनेकवेळा दिसून येत आहे. कर्मचारी काम करीत असलेल्या घटनास्थळी अधिकारीदेखील असतात. तरीदेखील त्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात का नाही, असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. याकडे महावितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना काम करताना स्वतःच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याचे आवाहन वारंवार केले जाते. यासाठी प्रशिक्षणही दिले जाते. तसेच, सुरक्षेचे साहित्यही वितरीत केले जातात.

ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी,
रायगड, महावितरण
Exit mobile version