| रायगड | प्रतिनिधी |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, रेवती गायकर, जोस्ना पाडियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे, निवासी उजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांच्यासह विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच आदिवासीक्षेत्रातील मतदारांचे मतदान देखील महत्त्वाचे असल्याने याकडे लक्ष द्यावे. मोठी गावे, शहरांमधील गर्दीची प्रभागे येथे मतदारांची संख्या मोठी आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक मतदान व्हावे, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.
मतांची टक्केवारी वाढावी यासाठी दिव्यांग मतदार, 85 वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक यांना आयोगाने घरून मतदान करण्याची (होम वोटिंग) सुविधा दिली आहे. याची अंमलबजावणी जिल्ह्यात व्हावी. तसेच, दिव्यांग मतदारांचे 100% मतदान होईल या दृष्टीने काम करावे, दिव्यांगांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी त्यांना द्यावयाच्या सुविधा सर्व मतदान केंद्रांपर्यंत उपलब्ध करण्यात याव्यात, असेही सूचित केले. पोस्टल व होम वोटिंगद्वारे होणारे मतदान मतपत्रिकेवर होणार आहे. या दृष्टीने यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांचे आवश्यक प्रशिक्षण काळजीपूर्वक केले जावे. सी-व्हीजील, आचारसंहिता कक्ष, जिल्हा निवडणूक सन नियंत्रण कक्ष याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी सतर्कता राखण्यात यावी, अशा सूचना डॉ. कल्याणकर यांनी दिल्या.
निवडणूक उन्हाळ्यात होत असल्याने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, मतदारांच्या रांगांसाठी सावली असलेल्या जागा, वरंडा अथवा मंडप, शेड निर्माण करण्यात याव्यात, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. दिव्यांग मतदारांचे मतदान सहज होण्यासाठी समाजसेवी संस्थाची मदत घेतली जावी. होम वोटिंगसाठी जाणाऱ्या पथकांनी मतपत्रिकेद्वारे होणारे मतदान गोपनीय राहील या दृष्टीने दक्षता घ्यावी. 2019 लोकसभा निवडणुकीत 62% मतदान झाले होते. यावर्षी त्यात वाढ अपेक्षित असून देण्यात आलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी, अस जावळे म्हणाले.
समितीनिहाय कामकाजाची माहिती सादर यावेळी निवडणूक विषयक विविध समितीनिहाय कामकाजाची माहिती सादर करण्यात आली. जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्ष, मतदार जागृकता व सहभागिता कार्यक्रम (स्वीप), सी व्हिजील ॲप, सक्षम ॲप, ईव्हीएम, 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांचे मतदान, पोस्टल मतदान व होम वोटिंग प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सरमिसळ प्रक्रिया, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक प्रशिक्षणासह विविध बाबींची माहिती देण्यात आली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक मतदान पूर्वतयारीबाबत माहिती सादर केली. निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी रायगड लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यापूर्वी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रूमची सुरक्षा, पायाभूत सुविधा, पॉवर बॅकअप आणि त्या ठिकाणी असलेल्या इतर सुविधांच्या आढावा कल्याणकर यांनी यावेळी घेतला. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.