मनसेचा संतप्त सवाल; जेएनपीटी प्रशासनाला ‘धडक’
| उरण | प्रतिनिधी |
मुंद्रा-न्हावा शेवा फ्रीपोर्ट टर्मिनलमधील भरतीसाठी जाहिरात उरणमध्ये, पण मुलाखती गुजरातमध्ये? हे नेमकं काय सुरु आहे? स्थानिकांना फसवून परप्रांतियांना नोकऱ्या देण्याचा नवा डाव आहे का? या संतप्त प्रश्नांची सरबत्ती करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट जेएनपीटी प्रशासनावर धडक दिली. यावेळी चेअरमन नसल्याने गुरुवारी भेटण्याची वेळ दिली आहे. मनसेने एसीपी व न्हावा शेवा पोलीस ठाण्यात निवेदन दिले.
मनसेचे रायगड जिल्हाप्रमुख संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी सोमवारी सकाळी जेएनपीटी कार्यालयावर जोरदार धडक दिली. स्थानिकांना गृहित धरून बाहेरच्यांना संधी दिली जात असेल, तर याला मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल, असा ताशेरेबाज इशारा त्यांनी दिला. ‘काम उरणमध्ये, जमीन उरणची, पाणी वीज उरणची, मग भरतीसाठी मुलाखती गुजरातमध्ये का?’, असा खडा सवाल ठाकूर यांनी उपस्थित केला.
मुंद्रा-न्हावा शेवा टर्मिनलमधील नोकरभरतीच्या जाहिराती व्हॉट्सॲप ग्रुपवर फिरत असून, त्या जाहिरातीत गुजरातमधील मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. उरणमध्ये झपाट्याने औद्योगिक विकास होत असतानाही, येथील स्थानिक सुशिक्षित तरुणांना दुर्लक्षित करून बाहेरच्यांना संधी देण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
स्थानिक तरुण बेरोजगारीच्या खाईत लोटले जात असताना, तथाकथित स्थानिक नेते गप्प का आहेत? त्यांची ही मूग गिळलेली भूमिका संशयास्पद आहे. “उरणकर तरुणांच्या हक्कावर गदा येईल, तर आम्ही झुकणार नाही, मुलाखती या उरणमध्येच झाल्या पाहिजेत, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन पेटवू!” असा थेट इशारा ठाकूर यांनी दिला.
यावेळी संदेश ठाकूर जिल्हाध्यक्ष मनसे रायगड, सत्यवान भगत तालुकाध्यक्ष मनसे, विजय तांडेल विधानसभा सचिव, रितेश पाटील शहराध्यक्ष द्रोणागिरी, कविता म्हात्रे, तालुका अध्यक्ष मनसे महिला, राकेश भोईर तालुका सचिव, आल्पेश कडू तालुका सचिव, दीपक पाटील उपतालुकाध्यक्ष, सुप्रिया सरफरे शहराध्यक्ष मनसे महिला, मालती म्हात्रे तालुका उपाध्यक्ष मनसे, कृष्णा ठाकूर विभाग अध्यक्ष मनसे, राजेश सरफरे, भालचंद्र म्हात्रे शाखाध्यक्ष नवीन शेवा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.







