स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत व्यवस्थापकच नसल्याने कामांना खीळ

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया पाली शाखेत ग्राहक खातेदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या बँकेत सतत नागरिकांची वर्दळ असते. अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचा कारभार ज्याच्या हाती असतो तो शाखा व्यवस्थापकच नसल्याने जनतेच्या कामांना खीळ बसत आहेत. शाखा व्यवस्थापकाच्या हातात संपूर्ण बँकेच्या कारभाराची धुरा व नियंत्रण असते. मात्र, पाली स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या शाखा व्यवस्थापकाची जागा रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. शिवाय बँकेत येणार्‍या नागरिकांना शासनाच्या नवनवीन योजना, उपक्रम, कर्ज प्रक्रिया याबाबत ही जलद माहिती मिळत नसल्याने नागरिकांत असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. बँकेचा कारभार ही धीम्या गतीने सुरू आहे, अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊन त्याबाबत विचारणा केली असता टोलवा टोलवी केली जाते. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पाली स्टेट बँकेत शाखा व्यवस्थापक रुजू करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहेत.

Exit mobile version