| उरण | प्रतिनिधी |
बोकडवीरा पोलीस चौकी ते कोट नाका दरम्यानच्या 1 हजार 600 मीटर लांबीच्या उरण पनवेल मार्गाचे रुंदीकरणाचे काम वेगात सुरू झाले. या कामात सात मीटर रुंद असलेला हा मार्ग 14 मीटर रुंद करण्यात येत आहे. या मार्गाला दुभाजक बसविण्यात येणार असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदाही काढली आहे. यामुळे लवकरच मोठा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होणार असून येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
उरण ते नेरुळ बेलापूर लोकल आणि उरणच्या द्रोणागिरी परिसरात वाढणारी लोकवस्ती यामुळे उरण-पनवेल मार्ग हा प्रचंड रहदारीचा होत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत येथे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दुहेरी मार्ग असलेल्या या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यात पावसाळ्यात तर हा मार्ग अधिकच अरुंद होतो. त्यामुळे वाहन चालवणे जिकिरीचे होते. उरण-पनवेल राज्य महामार्ग दोन आस्थापनांत विभागला गेला आहे. यात नवघर ते बोकडवीरा पोलीस चौकीपर्यंतचा मार्ग सिडकोकडे तर कोटनाका ते पोलीस चौकी हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रुंदीकरणाचे काम व्ही.एस.पाटील कंपनीकडून केले जात आहे.







