नेरळ नळ पाणीपुरवठा योजना रखडली
। नेरळ। प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायतसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. या नळपाणी योजनेच्या जुमापट्टी येथे असलेल्या जलकुंभाचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. त्यामुळे मागील वर्षभर पाणी टंचाईच्या झळा सोसत बसलेल्या आदिवासी वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर होण्याची शक्यता आहे.
या नळपाणी योजनेच्या सर्व जलकुंभाची कामे संथगतीने सुरु असून मे 2023 मध्ये नेरळ नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. नेरळ ग्रामपंचायतीची नळपाणी योजना जुनी झाली आहे. ही नळपाणी योजना जुनी झाल्याने शासनाने नेरळसाठी नवीन नळपाणी योजना मंजूर केली. या नळपाणी योजनेच्या कामाला एप्रिल 2023 मध्ये कार्यादेश देण्यात आले. त्यानंतर ठेकेदार कंपनीकडून अत्यंत संथगतीने कामाला सुरुवात केली होती. या नळपाणी योजनेमधील ज्या पाच ठिकाणी पाणी साठवण टाक्या आहेत. त्यातील सर्व जलकुंभांची कामे अत्यंत संथगतीने सुरु आहेत. ही कामे जुम्मापट्टी आणि आनंदवाडी या दोन्ही ठिकाणी सुरु असून या दोन्ही जलकुंभांची कामे केवळ खोदाईवर अडकली आहेत. ती पुढे जाताना दिसत नाहीत. ही सर्व कामे गेली दीड वर्षे सुरु झाली असून 10- टक्के पेक्षा पुढे जाण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थितपणे सुरु होण्यास अनेक अडचणी तसेच पाण्याची टंचाई कमी होण्यासअडचणी कायम आहेत. नेरळ गावात गेली दीड वर्षे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. असे असतानादेखील नवीन नेरळ नळपाणी योजनांच्या कामाबद्द्ल प्रचंड दिरंगाई होत असून नेरळ गावातील लोकांचे तोंडचे पाणी पळवून नेणार्या नळपाणी योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून देखील संबंधित ठेकेदार कंपनीवर दबाव येत नसल्याने नेरळ ग्रामस्थ संतप्त आहेत.