रुंदीकरणाचे काम जवळजवळ थांबले
आधुनिकीकरणात दळणवळणाची गरज
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोकणातील महामार्गांना विकास रेषा म्हणून ओळखले जाते. आधुनिकीकरणात वाढती दळणवळणाची गरज तसेच वाढते अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यातील महामार्गाचे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यातून निसर्गरम्य जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय तसेच इतर औद्योगिकीकरणास चालना मिळेल, अशी आशा होती. जिल्ह्यातील एकाही राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यात 5 महामार्ग प्रत्येक राष्ट्रीय महामार्गांचे प्रश्न वेगळे आहेत. ते सोडवण्यासाठी राजकीय नेत्यांचा कणखरपणा दिसत नाही. आपल्याच सत्ताविलासात रमणारे राजकारणी, कोकणी माणसाशी काहीही देणेघेणे नसणारे प्रशासकीय अधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम जवळजवळ थांबले किंवा लांबले तरी आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही नवीन प्रकल्पाला मंजुरी देण्यात येणार नाही, असे कोर्टाने सुनावल्यानंतरही 2014 पासून 2022 पर्यंत दहा वेळा प्रकल्प पूर्ण करण्याच्या तारखा देणे, हे सरकारच्या नाकर्तेपणाचेच निदर्शक आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील एकूण 6 टप्प्यांपैकी चार टप्पे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. सिंधुदुर्गमधील दोन्ही टप्पे पूर्ण होत आलेले असताना रत्नागिरी जिल्ह्यात कामांचा मात्र खोळंबा झाला आहे. राजापूर परिसरातील काम 70 टक्के पूर्ण झाले असले तरी रस्त्यांच्या दर्जाबाबत आत्ताच तो खराब असल्याची ओरड आहे. ठिकठिकाणी संरक्षण भिंती पडल्या आहेत. आरवली ते तळेकांटे या दरम्यानचे काम एमईपी कंपनी करत होती. सुरवातीला कंपनीने कामाचा चांगला वेग घेतला होता. नंतर कंपनीने काम सोडले. आता पु्ण्यातील रोडवेज सोल्युशन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. परशुराम ते आरवली या दरम्यानचे काम करणार्या चेतक कंपनीनेही काम सोडले आहे. ते काम आता इगल इन्फ्रा कंपनी करत आहे. पावसाळ्यानंतर याही कंपनीने काम संथ गतीने सुरू आहे. सरकारने या कंपनीची देणी पूर्ण केली आहेत.
महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत चिपळूणचे अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या. प्रत्येक सुनावणीत न्यायालय राज्य आणि केंद्र सरकारला रखडलेल्या कामाबाबत आणि घडलेल्या घटनांबाबत वारंवार फटकारत आली आहे. मात्र, तरीही त्यातून कोणालाही काही बोध घेतल्याचे आज पर्यंत दिसत नाही. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी हे रस्ते बांधणीच्या कामात देशपातळीवर विक्रम करीत असताना त्यांचे महामार्गाकडे दुलर्क्ष असल्याचे दिसते.
महामार्गावर एकूण 14 मोठ्या पुलांपैकी राजापूर पूल आत्ता पूर्णत्वास जात आहे. चार पुलांची कामे पूर्णत्वास गेली आहेत. उर्वरित पुलांची कामे सध्या सुरू आहेत. मार्च 2022 पर्यंत कामे पूर्ण करण्याचा मानस आहे. बहादुरशेख नाका येथील वाशिष्टी पुलाची एक बाजू खुली झाली आहे. मात्र, दुसर्या बाजूचे काम अजून सुरू आहे. खेड, चिपळूण, सावर्डे, लांजा, येथील उडाणपुलांची कामेही अजून ठप्प आहेत.