मुंबई-गोवा महामार्गाचे काम ठप्प

। माणगाव । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा या विकासाच्या मार्गावर निधीचा ब्रेक लागत असल्याने या महामार्गाचे काम ठिकठिकाणी ठप्प झाले आहे. त्यामुळे विकासाचा राजमार्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोकणाचा विकास खुंटला आहे. पहिल्या आणि दुसर्‍या टप्याचे काम थांबल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून दहा वर्षानंतरही महामार्गाच्या कामाचे हे भिजत घोंगडे पडले आहे. याकडे शासनाने दुर्लक्ष चालवले असून कोकणच्या वाट्याला उपेक्षा आजही कायमच राहिली आहे. पहिल्या टप्प्याचे पळस्पे ते इंदापूर पर्यंत महामार्गाचे रुंदीकरणात मार्गावर ठिकठिकाणी उड्डानपूल, भुयारी मार्ग, मोर्‍यांचे, पुलांचे तर कुठे रस्ता रुंदीकरणाचे काम तसेच भराव घालणे यांसह अनेक कामे ठिकठिकाणी अपूर्ण आहेत. त्यातच दुसर्‍या टप्प्याच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम इंदापूर ते कशेडी घाट असे सरकारने हाती घेतले आहे. त्याही कामाला फारशी गती नाही. अलीकडच्या काळात तेही काम थांबले आहे. पावसाळ्यात तब्बल 5 महिने काम पूर्ण बंदच राहिले. पाऊस गेला तरीही शासनाला हे काम पुर्ववत सुरु करण्यासाठी मुहूर्त मिळेना. गेली अनेक दिवस ही कामे ठप्प असल्यामुळे प्रवाशी, पर्यटकांना या मार्गावरून प्रवास करणेसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या इंदापूर ते कशेडी घाट हा मुंबई गोवा महामार्ग अरुंद असल्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अपघातही मोठ्या प्रमाणात होत असून अपघाताची संख्या वाढत आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवासी पर्यटक प्रवास करण्याचे शक्यतो टाळतात. या वाढत्या अपघातामुळे पुन्हा एकदा प्रश्‍न महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ऐरणीवर आला आहे. तसेच पर्यटकांनी कोकणाकडे या रस्त्यामुळे पाठ फिरविली आहे.

Exit mobile version