| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर शेलू बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ता नव्हता. त्यामुळे वाहनचालकांना रस्ता नसल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. मात्र, जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून रस्त्याचे काम मंजूर झाले असून, कच्चा रस्ता बनविण्यात आला असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना वाट चुकण्याचा धोका कमी झाला आहे.
उल्हास नदीवर पाच कोटी खर्चून पूल बांधण्यात आला. या पुलावरून मागील दोन वर्षांपूर्वी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, त्या पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने पक्क्या स्वरूपात तयार केले नाहीत. त्याचा परिणाम रस्ते तयार झालेले नसल्याने शेलू गावातून अवसरेकडे येणारे वाहनचालकांना रस्ता दिसत नसल्याने वाहनचालक स्वतःला हरवून जायचे. रात्रीच्या वेळी तर हा रस्ता भूलभुलैया वाटायचा आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी तर नवीन वाहनचालक या पुलाचा वापर करायला टाळत होते. पावसाळ्यात तर गवत उगवल्यावर वाहनाच्या वाहतुकीने निर्माण झालेली वाट पुसून जायची आणि त्यामुळे वाहनचालक रस्ता शोधताना भरकटत.
वाहनचालक यांची ही गैरसोय लक्षात घेऊन या पुलासाठी अनेक वर्षे पाठपुरावा करणारे कार्यकर्ते भरत भगत यांनी रायगड जिल्हा नियोजनमधून अवसरे भागाकडे जाणारा रस्ता बनवून घेण्यासाठी निधी मंजूर करून आणला. त्या निधीमधून शेलू पुलापासून अवसरे कडे जाणारा रस्ता बनविण्यात येत आहे.त्या ठिकाणी पावसाळा आधी कच्चा रस्ता बनविण्यात आला आहे. मातीचा रस्ता बनविला असून, हा रस्ता नंतर पक्का होणार आहे. मात्र, या रस्त्यामुळे आता रस्ता चुकण्याचा धोका कमी झाला आहे. त्याचवेळी रस्त्यामुळे वाहनचालक यांनादेखील शॉर्टकट समजला जाणार रस्ता वापरावा वाटत आहे. हा रस्ता आता तयार होतोय परंतु शेलू भागातील अर्धवट रस्ता देखील शासनाने लवकरात लवकर तयार करावा, अशी मागणी आता स्थानिक रहिवासी करू लागले आहेत.






