महिन्याभरात लोकसेवेसाठी जेट्टी उपलब्ध होणार
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
सागरमाला व राज्य शासन यांच्या माध्यमातून नऊ कोटी रुपये निधी मंजूर करून महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाकडून मुरूड तालुक्यातील एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील खोरा बंदरातील नवीन जेट्टी विकसीत केली जात आहे.हे काम प्रगतीपथावर असून महिन्याभरात नवीन जेट्टी लोक सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याने स्थानिक कोळी मच्छिमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मुरुड पर्यटक क्षेत्र असल्याने ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रोज शेकडो पर्यटक राजपुरी व खोरा बंदर या जेट्टीवरुन किल्ला पाहण्यासाठी येत असतात परंतु खोरा बंदरातील जुनी जेट्टीची रुंदी व उंचीने कमी असल्याने किल्ल्यात जाण्यासाठी ओहोटीच्या वेळी पर्यटकांना उतरण्यासाठी व चढण्यासाठी खुप त्रासदायक होत आहे. त्याबरोबर मच्छिमार बांधवांना बोटी किनार्याला लावणे खूप कठीण होत आहे. विचार करून शासनाने नवीन जेट्टी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले असून नवीन जेट्टी खोल समुद्रात 100 मीटर लांबी व 10 मीटर रुंदीची नवीन जेट्टी उभारण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला. आता या नवीन जेट्टीचे काम शेवटच्या टप्प्यात असून पंधरा दिवसात काम पूर्ण होईल. महिन्याभरात या नवीन जेट्टीवरुन पर्यटकांना जंजिरा किल्ल्यात व पद्मदुर्ग किल्ल्यात ये-जा करण्यासाठी खुला करण्यात येणार असल्याने हा प्रवास सुखकर होणार आहे.
खोरा जेट्टीचं काम ‘द.एच.कंपनी पनवेल’ ठेकेदार हेमांशु यांना देण्यात आले असून या कामाला सुरुवात 13 मार्च 2023 या दिवशी करण्यात आली आहे. वर्षभरात ठेकेदारांनी 100 मीटर लांबीचं काम पूर्ण केले असून सध्या पर्यटकांना उतरण्यासाठी व चढण्यासाठी पायर्या व रेलिंगचे काम सुरू आहे. पंधरा दिवसात काम पूर्ण होईल. स्थानिक कोळी बांधवाना बोटी लावण्यासाठी व पर्यटकांसाठी महिन्याभरात सेवेसाठी जेट्टी लवकरच उपलब्ध होणार आहे. अशी माहिती उपअभियंता दिपक पवार यांनी दिली.