| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा खोपटा जुना पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे. वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या खड्डेमय खोपटे कोप्रोली मार्गाच्या व खोपटे खाडी पुलाच्या खोपटे पुलाच्या दुरुस्तीला 5 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी पुढील तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तर खोपटे खाडी पूल दुरुस्तीसाठी पुढील चार महिन्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
खोपटे कोप्रोली मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना वाहतूक कोंडी सह अपघाताचा ही धोका वाढला आहे. या दोन्ही ठिकाणच्या कामांच्या दुरुस्तीच्या निविदा जाहीर होऊनही त्याच्या कामाला सुरुवात झालेली नव्हती. त्यामुळे येथील नागरिक, प्रवासी आणि वाहतूकदार यांच्याकडून संताप व्यक्त केला जात होता. तर उरण सामाजिक संस्थेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाला सुरुवात केली आहे.
त्याचप्रमाणे खोपटे खाडी पुलावरील खड्डे दुरुस्तीसाठी आधुनिक पद्धतीने पुलाचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठीची ही निविदा मंजूर झाली आहे. या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या वाढत्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जुन्या खोपटे पुलाच्या मजबुती करणासाठी पाच कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा तयार केला असून, या पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे.
उरण तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागांना जोडणाऱ्या खोपटे पुलाच्या दोन्ही मार्गिका खड्डेमय झाल्या आहेत. पुलावरील या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली होती. या पुलावरून दररोज शेकडो अवजड वाहने वाहतूक करीत आहेत. उरणच्या दोन विभागांना जोडणाऱ्या महत्वाच्या खोपटे पुलावर ये- जा करण्यासाठी दोन मार्गिका आहेत. या पुलावरील डांबरेचे थर उखडल्याने खड्डे झाले आहेत. यात जुन्या पुलावरील स्लॅब मधील लोखंडी सळ्या मोकळ्या झाल्या आहेत. त्यात वाहनांचा टायर अडकून अपघात होण्याची शक्यता वाढली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या या पुलाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या पुलावरून अवजड वाहना बरोबरच प्रवासी वाहने ही मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत. या प्रवासी वाहनांना ही धोका निर्माण झाला आहे. खोपटे पूल ते कोप्रोली हा मार्ग आधीच नादुरुस्त आहे. याचा फटका येथील प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे खोपटे पूल आणि मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती.
खोपटे कोप्रोली मार्ग आणि खोपटे खाडी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली असून यासाठी तीन महिने लागणार आहेत. हा एक किलोमीटरचा मार्ग दुरुस्त करण्यात येणार आहे. तर खोपटे पुलाचे काम चार महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
–नरेश पवार
सार्वजनिक बांधकाम विभाग
अतिरिक्त अभियंता
खोपटे कोप्रोली मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. मात्र, या परिसरात ये- जा करणारी शेकडो कंटेनर वाहने अडकल्याने या मार्गावर कंटेनर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीतही भर पडली आहे.
–संजय ठाकूर
सामाजिक कार्यकर्ते







