रेवस ते करंजा पूलाचे काम मार्गी लागणार

माजी मुख्यमंत्री बॅ. अ र अंतुले यांचे स्वप्न होणार साकार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. बॅ. अब्दुल रहेमान अंतुले यांच्या महत्वाकांक्षी स्वप्न असणारे अलिबाग तालुक्यातील रेवस ते करंजा पुलाचे काम मार्गी लागणार असल्याने रायगडकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 40 वर्षापासून हा पुल व्हावा यासाठी बॅ अंतुले आणि तत्कालिन सर्वच नेत्यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर हे यश दृष्टीक्षेपात आले आहे. केंद्र सरकारच्या सागरी महामार्गाचाच एक भाग म्हणून हा पूल उभारण्यात येणार आहे. मात्र सध्या शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने यासाठी निधी कसा उभा करणार हा मोठा प्रश्‍न उभा आहे. प्रस्तावित असलेल्या या पुलाची निविदा प्रक्रिया ऑक्टोबर पर्यंत सुरू करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत. त्यामुळे अलिबागकरांचा 70 किमीचा वळसा वाचणार असून अलिबाग शहर मुंबईच्या अधिकच जवळ येणार आहे.

कोकणात प्रस्तावित असलेल्या सागरी महामार्ग प्रकल्पात रेवस करंजा याच्या दरम्यानचा हा पूल प्रस्तावित आहे. हा पूल चिरले इथपर्यंत येत असलेल्या सिडकोच्या रस्त्याला हा पूल जोडला जाणार आहे. या पुलासाठी 850 कोटी रुपयांचा निधी लागणार असून, प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी सीआरझेड आणि वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी 9 हेक्टर जमिनीचे संपादन देखील करावे लागणार आहे. मात्र या पुलाने या भागाला मोठा फायदा होणार आहे. तसेच शिवडी न्हावा-शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि हा पूल पूर्ण झाल्यास अलिबाग आणि मुंबईतील अंतर कमी होणार असल्याने या पुलाचे काम लवकरच लवकर सुरू करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. येत्या चार महिन्यात सर्व प्रकारच्या परवानग्या आणि भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यात या पुलाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश त्यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत.

माजी मुख्यमंत्री बॅ अंतुले यांनी दिली मंजुरी
1982 सालापासून अलिबाग तालुक्यातील रेवस ते करंजा यांच्या दरम्यान पूल बांधण्याची मागणी करण्यात येत होती. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय ए. आर. अंतुले यांनी हा पूल बांधला जावा यासाठी अथक प्रयत्न केले होते. त्यांच्याच काळात या पुलाला मंजूरी देखील मिळाली होती. मात्र त्यांचे मुख्यमंत्री पद अल्पकाळ ठरल्यानंतर हा प्रकल्प अडकला होता. हा पूल तयार झाल्यास तळकोकणात जाण्यासाठी एक पर्यायी मार्ग तयार होऊ शकेल. तसेच अलिबाग शहरातील नागरिकांना घ्यावा लागणारा 70 किलोमीटरचा वळसा वाचणार आहे.

Exit mobile version