संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा; पर्यायी सुरक्षित रस्त्यांची मागणी
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात रेल्वे प्रशासनाने आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनांचा भंग करत पुन्हा कामाला सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पर्यायी रस्ता पूर्णपणे सुरक्षित व वाहतुकीस योग्य केल्याशिवाय उड्डाणपुलाचे काम सुरू करू नये, अशी स्पष्ट मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. मात्र, आंदोलकांची पाठ फिरताच रेल्वे प्रशासनाने कामाला अधिक वेग दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी रोहा रेल्वे उड्डाणपुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात संकेत कोतवाल (32) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आणि नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. आंदोलना दरम्यान आंदोलकांनी उड्डाणपूल प्रकल्पाचे अभियंता ओमकार म्हात्रे यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता. जो पर्यंत पर्यायी रस्ता पूर्णपणे सुरक्षित आणि वाहतुकीस योग्य केला जात नाही, तोपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू करू नये, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली होती. त्यावेळी प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला होता. मात्र, या आश्वासनांची अंमलबजावणी न करता रेल्वे प्रशासनाने उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा अधिक जोमाने सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलकांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवत प्रशासनाने काम सुरू केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
अजून किती अपघातांची वाट पाहत आहात? रस्ता सुरक्षित होण्यापूर्वी काम सुरू करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासन, संबंधित कंत्राटदार आणि प्रकल्प अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांचे म्हणणे आहे की, पर्यायी रस्ता अद्यापही अनेक ठिकाणी खड्डेमय, अरुंद आणि धोकादायक अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे
आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनांची तातडीने पूर्तता करून पर्यायी रस्ता पूर्णपणे दुरुस्त व सुरक्षित केल्यानंतरच उड्डाणपुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा केली आहे. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिल्याने रोह्यातील वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
