रोहा-उसर रस्त्याचे काम रखडले

शेकडो पर्यटकांना फटका

| रोहा | प्रतिनिधी |

रोहा काजूवाडीमार्गे उसर या मुख्य रस्त्याच्या साईडपट्टीचे काम गेली कित्येक वर्षे रखडले आहे. त्याचप्रमाणे जागोजागी खड्डे असल्याने या मार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे जात आहे. अशा परस्थितीत रविवारी नेहमीप्रमाणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो पर्यटकांना फटका बसला असून, सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली. मुरुडकडे जाण्यासाठी जवळचा पर्यायी मार्ग पण साईडपट्टी नसलेला सिंगल तो देखील खड्डेमय रस्ता असल्याने या रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी अक्षरशः कानाडोळा केल्याने नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे.

रोहा-शिघ्रे मार्गे मुरुड व रोहा-मुरुड मार्गे अलिबाग या मुख्य मार्गांवरून हजारो पर्यटक सुट्टी साजरी करण्यासाठी जात असतात. पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी उन्हाळी सुट्टी साजरी करण्यासाठी पर्यटक व स्थानिक नागरिक उसरमार्गे मुरुड या जवळच्या मार्गाला पसंती देतात. रविवार असल्याने हजारो पर्यटकांनी मुरूड समुद्रकिनारी फिरण्याचा बेत आखला. मात्र, उसरमार्गे मुरूड व त्यानंतर अलिबाग येथे जात असताना वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यानंतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. उसर मार्गाच्या साईडपट्टीचे काम गेली कित्येक वर्षे रखडला आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यावर जीवघेणे खड्डेदेखील असल्याने नागरिक व पर्यटकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. एकतर सिंगल रस्ता, त्यात सुट्टीत दुहेरी वाहतूक सुरू झाल्याने अनेकांना वाहतुकीचा फटका बसला असून, तासन्‌‍तास रांगेत उभे राहावे लागल्याने हाल झाले होते.

या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी गतवर्षी स्थानिकांनी भरपावसात रास्ता रोखो आंदोलन केलं होतं. यावेळी पावसाळ्यानंतर सदर रस्त्याचे काम मार्गी लागेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दुसरा पावसाळा तोंडावर आला तरी या रस्त्याचे काम होत नसल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटक वर्गातून संताप व्यक्त होत आहे..

Exit mobile version