खारेपाटातील पाईपलाईनचे काम अपूर्णावस्थेत

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची दिरंगाई
धैर्यशील पाटील यांनी सुनावले खडे बोल

| पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील हेटवणे ते शहापाडा आणि शहापाडा ते खारेपाट पाईपलाईनचे काम तात्काळ पूर्ण करुन पाणीप्रश्‍न कायमचा मिटावा यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर 23 नोव्हेंबर 2021 रोजी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी हे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आश्‍वासन कार्यकारी अभियंत चंद्रकांत गजबिये यांनी दिले होते. परंतु, अद्याप अनेक ठिकाणची कामे अपूर्णावस्थेत असल्याने माजी आ. धैर्यशील पाटील यांनी प्राधिकरणाला खडे बोल सुनावले.

दरम्यान, त्यावेळी धैर्यशील पाटील यांनी अधिकारी वर्गाला जास्तीचे दहा दिवस देत 10 एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र, तरीही काम पूर्ण झाले नाही, तर शेकाप स्टाईलने काम पूर्ण करुन घेऊ, असा सज्जड दम दिला होता. परंतु, 10 एप्रिल उलटून गेली तरी अजून अनेक ठिकाणची कामे बाकी आहेत. त्यात हेटवणे ते शहापाडादरम्यानचे जवळपास दोन किलोमीटरचे काम, रायझिंग मेलजवळील 50 मीटरचे काम, शहापाडा धरणावरील जलशुद्धीकरण केंद्राजवळील काम निम्म्याहून अधिक, वाशी नाका ते वाशी या दरम्यान 800 मीटरचे पाईप जोडणे, वाशी गावापासून पुढे 300 मीटरची पाईप जोडणी, अशी एकूण 1100 मीटर पाईपलाईन जोडणीची कामे अपूर्णावस्थेत आहेत.
याबाबत आक्रमक होत धैर्यशील पाटील यांनी कामाचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जि.प. माजी सदस्य प्रभाकर (हरीओम) म्हात्रे, दिलीप पाटील, राजन झेमसे, स्वप्निल म्हात्रे, मुरलीधर भोईर, नगरसेवक संतोष पाटील यांनी अधिकार्‍यांना जाब विचारला; परंतु प्रभारी असलेले कार्यकारी अभियंता विजय कुमार सूर्यवंशी यांनी कामाला झालेल्या दिरंगाईबाबत दिलगिरी व्यक्त करत गप्प राहण्याचे धोरण अवलंबले. यावेळी जि.प. माजी सभापती डी.बी. पाटील, हरिश्‍चंद्र पाटील, के.डी. म्हात्रे, शरद पवार, शोमेर पेणकर, संदेश ठाकूर, काशिनाथ पाटील, विजय ठाकूर, अमित पाटील आदींसह मोठ्या प्रमाणात खारेपाटातील जनता उपस्थित होती. यासंर्भात प्रांत कार्यालयात तातडीच्या बैठकीचे आयोजन करुन नगरपालिका हद्दीतील पाईपलाईनचे काम व इतर कामांसाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार असल्याचे समजते.

नगरपालिकेची कामास मनाई
नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील 500 मीटर पाईपलाईन टाकण्यास नगरपालिकेने मनाई केली आहे. तर, अगोदर टाकलेल्या पाईप लाईनचे 250 मीटर पाईप तातडीने काढण्यास सांगितल्याची धक्कादायक माहिती अभियंता ए.डी. कोठेकर यांनी दिली.

… तर कार्यकर्ते जोडणी करतील
अखेर येत्या दोन दिवसांत यावर उपाययोजना झाली नाही, तर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते पाईप लाईनसाठी स्वतः खोदाई करून पाईपलाईन जोडणी करतील, मग गुन्हे नोंद झाले तरी मागे हटणार नाहीत, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Exit mobile version