| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
खारघर, सेक्टर 10 मधील ज्वेल हाईट इमारतीसमोरील सुमारे 100 ते 150 मीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून डांबरीकरणाविना रखडलेला होता. सुरुवातीला सिडकोच्या ताब्यात असताना हा रस्ता तयार झाला; मात्र नंतर पनवेल महानगरपालिकेच्या अखत्यारीत आल्यानंतरही या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती अथवा डांबरीकरणाचे काम झाले नव्हते. परिणामी, येथील रहिवासी मोठ्या गैरसोयीला सामोरे जात होते.
ज्वेल हाईट्स सोसायटीचे चेअरमन प्रशांत शिंगाडे, अशोक भोसले, विनोद वावरे, देवेंद्र शर्मा, वीरेंदर शर्मा, हिना सिंग यांनी सर्व कमिटी सदस्यांसह खारघर भाजप शहर मंडलाचे उपाध्यक्ष अजित अडसुळे यांना बोलावून नुकतीच भेट घेतली. रखडलेल्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. अडसुळे यांनी तात्काळ पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधत संबंधित विभागाला निर्देश दिले. त्यानंतर पुढील तीन दिवसांत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. काम सुरू होताच काही आजी-माजी समाजसेवकांनी घटनास्थळी येऊन फोटोसेशन करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता मार्गी लावण्यासाठी रहिवाशांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच कामाला गती मिळाल्याचे नागरिकांचे मत आहे. रस्त्याच्या डांबरीकरणामुळे ज्वेल हाईट परिसरातील वाहतूक पूर्वीपेक्षा सुरळीत होण्यास मदत होणार असून रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.







