बोगद्याची लांबी 300 मीटर
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत- पनवेल रेल्वे मार्ग नव्याने बांधला जात आहे. या मार्गावर कर्जत तालुक्यात दोन बोगदे असून, त्यातील किरवली गावाजवळ असलेला 300 मीटर लांबीचा वांजळे गाव येथील बोगदा अंतिम टप्प्यात आहे. या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून केवळ रूळ टाकण्याची कामे शिल्लक असल्याने लवकरच या मार्गावरून उपनगरीय लोकल ट्रेन सुरु होण्याची शक्यता वाढली आहे.
2005 मध्ये बांधण्यात आलेल्या पनवेल- कर्जत या एकेरी रेल्वे मार्गाच्या हलीवली येथील बोगद्याचा भाग ठिसूळ दगडाचा असल्याने मोठ्या प्रमाणात दगड कोसळत असतात. त्या दगडांनी अनेकांचे जीव गेले असून, हा मार्ग उपनगरीय लोकल साठी फेल गेल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने पनवेल- कर्जत असा नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला. चौक पासून कर्जत असा पूर्णपणे नवीन तर पनवेल ते चौक स्टेशन असा जुन्या मार्गावर हा प्रकल्प आधारित आहे. या मार्गावर कर्जत तालुक्यात किरवली वांजळे गावाच्या हद्दीत एक बोगदा खोदण्यात आला आहे. दुहेरी मार्गिका टाकण्यासाठी हा मार्ग बांधला जात असल्याने मध्य रेल्वे कडून प्रशस्त जागा ठेवून बोगदा बनवण्यात आला आहे. या 300 मीटर लांबीच्या बोगद्याचे एक टोक किरवली गावाच्या हद्दीत तर दुसरे टोक हे वांजळे गावाच्या हद्दीत निघते.
या बोगद्याच्या तीन येणाऱ्या मार्गिका वगळता अन्य सर्व कामे पूर्ण झाली असून, हा बोगदा सोडल्यानंतर कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्ता आहे. त्या रस्त्याला उड्डाण पूल देखील बांधून पूर्ण आहे आणि त्यामुळे या नवीन बोगद्यामुळे कोणताही अडथळा रस्ते मार्गाला राहिला नाही. कर्जत- पनवेल रेल्वे मार्गावरील या नवीन बोगद्याचे काम पूर्ण झालेले असल्याने या मार्गावर उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरू करण्याच्या मार्गातील अडथळे कमी झाले आहेत.







