अधिकार्यांकडून कारवाईबाबत चालढकलपणा
| उरण | वार्ताहर |
उरण नगरपालिका हद्दीत पुनर्विकास व नवीन इमारती बांधण्याचे काम बिल्डर लॉबीकडून सुरू आहे. मात्र, हे करीत असताना बिल्डरांकडून नियमांची पायमल्ली करून मनमानीप्रमाणे सार्वजनिक व मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर कब्जा करून काम सुरू आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत नगरपालिका अधिकारीवर्गाकडे विचारणा केली असता ते याबाबत बोलणे टाळून आपल्याकडे कोणाची तक्रार नसल्याचे नगररचनाकार निखिल ढेरे सांगतात. यावरून कोणाची तक्रार आली तर कारवाई करणार, असे थातूरमातूर उत्तर देऊन चालढकलपणा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
उरण नगरपालिका हद्दीत प्रशासकी कारभार असल्याने बिल्डर लॉबीने काही सत्ताधार्यांना हाताशी धरून अधिकारीवर्गाकडून अनेक इमारतींना मोठमोठे टॉवर उभारण्यासाठी परवानगी घेतली आहेत. या परवानगी नियमांची पायमल्ली करून घेतल्या असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. त्यात खोटी कागदपत्रे सादर केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसारही इमारतींचे काम न होता मनमानीप्रमाणे बिल्डरांकडून काम सुरू आहे. काम करीत असताना वाहतुकीसाठी मुख्य रस्ता असलेल्या रस्त्यावर अवजड वाहन उभे करीत इमारतींचे बांधकाम सुरू आहे. सदरचे काम सुरू असताना नगररचनाकार निखिल ढेरे यांना अनेकवेळा मोबाईलवर संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यावरून नियमांची पायमल्ली सुरू असताना कोणी तक्रार केली तर त्याला उत्तर देऊ नये म्हणून टाळले जात असल्याचे उघड होत आहे.
आजच्या घडीला उरण शहरात अनेक बिल्डर लॉबीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यातील बहुतांश कामे ही नियमांचे उल्लंघन करून सुरू आहेत. याबाबत तक्रार करूनही नगरपालिका अधिकारीवर्गाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. भविष्यात याचे दुष्परिणाम येथील रहिवाशांना भोगावे लागणार आहे. त्याचे कोणतेही सोयरसुतक अधिकारी वर्गाना नसून, ते आर्थिक हित साधून काही वर्षांनी बदली करून जातील, अशी चर्चा येथील जनतेत सुरू आहे.







