| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेलच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी कुशल व कुशल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू झाले आहे. थकीत वेतन त्वरित करण्याबाबत जोपर्यंत लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन चालूच राहील, असा इशारा कर्मचाऱ्यांच्यावतीने देण्यात आला आहे. फोकस फ्यॉसिलिटी व सिक्युरिटी लिमिटेड या ठेकेदारामार्फत रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एप्रिल व मे या महिन्यांचा पगार थकीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. करार संपलेला असताना सुद्धा मागील दोन महिन्यापासून कर्मचारी आजतागायत काम करत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचे लेखी आदेश अथवा नियुक्तीपत्र देण्यात आले नाही. हे कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करत आहेत.
आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे हे कर्मचाऱ्यांना मान्य असून जर या कर्मचाऱ्यांना मोबदला मिळणार नसेल तर ती पिळवणूकच आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय आहे. बरेचसे कर्मचारी आर्थिक अडचणीमध्ये आहेत. थकीत वेतन देण्याची लेखी हमीपत्र व चालू करार मंजूर होण्यापूर्वी ग्रामीण रुग्णालयामार्फत नियुक्ती मंजूर करून घ्यावी.पुढील आदेश कर्मचाऱ्यांना प्राप्त झाले तर कर्मचारी कामावर हजर होतील. यासाठी उपजिल्हा रुग्णालयाने पुढाकार घ्यावा, अशी विनंती सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे.