जिल्ह्यात तलाठ्यांचे काम बंद आंदोलन

हिंगोलीत तलाठ्याचा हत्येचा निषेध

। अलिबाग । प्रतिनिधी ।

हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजे येथील तलाठी कर्मचार्‍याची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी रायगड जिल्हा तलाठी संघाच्या वतीने जिल्ह्यात निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानुसार एकदिवसीय लक्षवेधी काम बंद पुकारण्यात आले. या बंदचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला. वारस नोंदीपासून उत्पन्न व इतर दाखल्यांसाठी लागणार्‍या पंचनाम्यांची प्रक्रिया गुरुवारी न झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजे येथील कार्यालयात शासकीय कामकाज करीत असताना मारेकर्‍यांनी तलाठी संतोष पवार यांची चाकूने भोसकून हत्या केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने मयत झाले. पवार यांच्या हत्येविरोधात महाराष्ट्रात तलाठी वर्गामध्ये तीव्र पडसाद उमटले आहे. रायगड जिल्ह्यातदेखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या भ्याड व निंदणीय हत्येबाबत रायगड जिल्हा तलाठी संघाकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, रायगड जिल्हा तलाठी संघाच्या वतीने गुरुवारी निषेध व्यक्त करीत एक दिवसाचे लाक्षणिक लक्षवेधी काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.
आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, फास्ट टॅ्रक न्यायालयात ही केस चालविण्यात यावी, मयताच्या कुटुंबियांना किमान 50 लाख रुपयांची मदत मिळावी, त्यांच्या वारसांना अनुकंपाद्वारे तात्काळ शासकीय सेवेत घ्यावे, सरकारी कर्मचार्‍यावर असे अन्याय पुन्हा होेऊ नये यासाठी अजामीनपात्र गुन्हा करण्यात यावा, अशा अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

Exit mobile version