एकदिलाने काम करा; जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत 50 टक्के तरुणांना संधी दिली जाणार आहे. शेकापसह महाविकास आघाडीचे काँग्रेस व शिवसेना पक्षदेखील मन लावून या निवडणुकीत उतरले आहेत. हा एक विजयाचा मार्ग आहे. एक वेगळ्या वातावरणात ही निवडणूक होणार आहे. अलिबाग शहराच्या विकासाला प्रशांत नाईक यांच्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने एकदिलाने काम करून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यायची आहे, असे आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.

अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक शेकाप भवन येथे रविवार, दि. 9 नोव्हेंबर रोजी झाली. या बैठकीत जयंत पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात नगरपरिषदांच्या निवडणुका वेगळ्या वातावरणात होत आहेत. शेकापसह महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली जाणार आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे पक्ष एकत्र येऊन राज्यभर निवडणूक लढवित आहोत. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येकाने एकोप्याने काम करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या बैठकांच्या माध्यमातून राज्यस्तरावर याबाबत निर्णय झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने काम करून ही निवडणूक लढण्यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी शहराचा एक वेगळा कायापालट केला आहे. अलिबाग शहराची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे राज्यामध्ये अलिबाग शहराचे नाव कायमच घेतले जाते. महाविकास आघाडी एकत्र आल्याने आपला विजय हा निश्चित झाला आहे. मात्र, गाफील न राहता, काम करायचे आहे. प्रचारासाठी कालावधी कमी आहे. ही एकी अशीच ठेवून अलिबाग शहराची असलेली ओळख कायमच टिकवून ठेवा, असे आवाहन शेवटी जयंत पाटील यांनी केले.

Exit mobile version