। मुंबई । प्रतिनिधी ।
अंधेरी (पूर्व) येथील मरोळ परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन कामगार अडकले. दोन्ही कामगारांना अग्निशमन दलाच्या जवानांकडून बाहेर काढण्यात आले. त्यातील एका कामगाराला वाचवण्यात यश आले. मात्र, एकाचा मृत्यू झाला. सोनेलाल प्रसाद (27) असे मृत कामगाराचे नाव आहे.
अंधेरीतील मरोळ परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू होते. सोमवारी (दि. 16) सायंकाळच्या सुमारास खोदकाम सुरु असताना माती खचली आणि दोन कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, मुंबई महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील कर्मचारी, पोलीस व 108 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. दोन्ही कामगारांना अग्निशमन दलाच्या जवानांकडून बाहेर काढण्यात आले. जखमी कामगारांना तात्काळ कूपर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच एका कामगाराचा मृत्यू झाला.