| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
खांदा कॉलनी सेक्टर-1 भागात इमारतीच्या चौथ्या मजल्यावर पाण्याची टाकी साफ करण्याचे काम सुरु होते. तेथील सिमेंटचा पत्रा फुटल्याने एक कामगार खाली पडून त्याचा मृत्यू झाला. मारुती जोमा घुटे (28) असे या कामगाराचे नाव आहे. मृत कामगाराला ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली साधने न पुरवल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जाते.
खांदेश्वर पोलिसांनी याप्रकरणी ठेकेदाराला जबाबदार धरून त्याच्याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. मारुती हा पनवेल तालुक्यातील धोदाणी येथे कुटुंबासह राहत होता. खांदा कॉलनीतील ठेकेदार नागेश गुप्ता याच्याकडे तो काम करायचा. नागेश याने मारुतीला खांदा कॉलनी सेक्टर 1 मधील साई सिमरन सोसायटीतील टेरेसवरील पाण्याची टाकी साफ करण्याच्या कामासाठी पाठवलेे होते.
मारुतीने या इमारतीवरील पाण्याची एक टाकी साफ केली होती. त्यानंतर तो दुसरी टाकी साफ करण्यासाठी छताच्या सिमेंटच्या पत्र्यावरून जात असताना अचानक पत्रा तुटला व तो चौथ्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
. . . . . .