| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आवासमधील सुरेखार मळा येथे एका कामगाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.21) दुपारी घडली असून, याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हॉटेलचे बांधकाम सुरु असताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, नकूल गुरुदेव मंडल (36) असे या कामगाराचे नाव आहे. हा कामगार मुळचा बिहार राज्यातील असून सध्या आवास येथे राहत होता. आवासमधील सुरेखार मळा जे डब्लू मेरेट या कंपनीच्या बंग्लो साईटवर तो काम करीत होता. अमोल कपाडीया यांच्या मालकीच्या जागेत हॉटेलचे बांधकाम सुरु होते. रविवारी दुपारी काम करीत असताना नकूल मंडल या कामगाराच्या अंगावर एक मोठी फळी पडली आणि तोल जाऊन तो दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला तात्काळ अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तो अगोदरच मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आवासमध्ये कामगाराचा मृत्यू
