ठेकेदाराच्या खुनप्रकरणी कामगाराला जन्मठेप

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| माणगाव-महाड | प्रतिनिधी |

बांधकाम ठेकेदाराचा निर्घृण खून केल्याप्रकरणी गवंडी कामगार जमिल मेहबुब शेख याला जन्मठेपेची शिक्षा व 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा महत्वपूर्ण निर्णय माणगाव सत्र न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे तब्बल आठ वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या घटनेला न्याय मिळाला आहे. ही घटना 5 एप्रिल, 2018 रोजी महाड तालुक्यातील सुंदरवाडी नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घडली होती. या घटनेत बांधकाम ठेकेदार अन्सार बहादूर बेग यांचा निर्घृण खून झाला होता.

जमिल मेहबुब शेख (50) हा अन्सार बेग यांच्याकडे गवंडी म्हणून रोजंदारीवर काम करत होता. कामासाठी त्याने त्यांच्याकडून 13 हजार रुपये आगाऊ रक्कम घेतली होती. दरम्यान, जमिल शेख याने गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली असता, आधी घेतलेल्या रकमेच्या बदल्यातील काम पूर्ण करूनच जाण्याचा आग्रह अन्सार बेग यांनी धरला. यावरून दोघांत वाद होऊन धक्काबुक्की व मारामारी झाली. या वादातून संतप्त झालेल्या जमिल शेखने जवळील मोठा दगड उचलून बेग यांच्या उजव्या कानाजवळ डोक्यात जोरदार मारला. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जमिल शेख याच्या विरूद्ध महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे झाली. अखेर सोमवारी (दि.12) जमिल शेख यांना दोषी ठरविण्यात आले असून बुधवारी (दि.14) शिक्षेवरील युक्तिवादानंतर शेख यांना जन्मठेप व 1 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

Exit mobile version