60 वयाचे कारण देत अचानक कामावरून काढून टाकलं
| खोपोली | प्रतिनिधी |
कलादिग्दर्शक नितीन देसाईच्या निधनानंतर शासनाने दोन वर्षांपूर्वी ताब्यात घेतल्यापासून कामगारांना पगार वाढ नाही, कोणतीही सुविधा नाही, कायस्वरूपी कामगारांना कोणतेही पूर्व कल्पना न देता कॉन्ट्रॅक्टमध्ये वर्ग केले आहे. बारकू तरे कामागार कामावर असताना ह्दयविकाराच्या झटका आला. रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी रूग्णवाहीका नसल्यामुळे दुचाकीवरून रूग्णालयात घेऊन जावे लागले. रूग्णालयातात वेळेवर पोहचले नसल्यामुळे तरे यांचा दुदैवी मृत्यू झाला. बारकू तरेच्या कुटूंबाला कोणतीही आर्थिक मदत केली नसल्यामुळे कामगारांनी आक्रामक पवित्रा घेऊन प्रसारमाध्यमांकडे व्यथा मांडल्याने एनडीज् आर्ट वर्ल्ड स्टुडियो प्रा.लि कंपनीच्या प्रशासनाने 60 वर्ष वयाचे कारण देत जवळपास 14 कामगारांना काढल्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. कंपनी प्रशासनाने अधिक वय असल्याचे सांगत मुख्य गेटवरून प्रवेश देऊ नये असा परिपत्रक काढले आहे.
खालापूरातील कर्जत- चौक रस्त्यावरील एनडी स्टुडियो स्थानिक कामगार अनेक वर्षापासून काम करीत आहेत. कलादिग्दर्शक नितीन देसाई असताना कामगारांना वेळेवर पगार आणि सर्व सुविधा मिळत होत्या तसेच कामागारांचा मानसन्मान राखला जात होता, मात्र राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी एनडी स्टूडियो ताब्यात घेतला आहे. तेव्हापासून याठिकाणी एकही शुटींग सुरू नाही, तसेच दादांबरोबर अनेक वर्ष कामगारांना 300 रूपयात राबवितात. मात्र नवीन कामगारांना 30 हजाराच्या पुढे पगार देताना टेंडर प्रोसेस लागू नाही का? अशी प्रचंड नाराजी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केल्याने काही कामागारांनी नोटीस बजावली आहे. तर 60 वयाचे कारण देत सुरक्षारक्षक आणि इतर कामागारांना अचानक कामावरून काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
कामगारांनी एनडीज् स्टुडियोच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जमून या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एनडीज् स्टुडियो सुरू झाल्यापासून नितीन देसाई यांच्यासमवेत काम केल असून संपूर्ण आयुष्यभर श्रम केले आहे. सेवानिवृत्ती देताना मानसन्मान न देता तडकाफडकी कामावरुन काढून टाकणे निंदनीय आहे. शासनाने आम्हाला सेवानिवृत्ती निमित्ताने हिशोब द्यावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
