| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पाताळगंगा हद्दीतील एमआयडीसी परिसरातील बोरीवली येथील मे नोबोझम साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कॉन्ट्रक्ट तत्त्वावर जवळपास 15 ते 20 कामगार संकल्प मॅन पॉवर आणि फॅसिलीटी सर्व्हिसेस प्रा.लि. या ठेकेदारामार्फत कंपनीत गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ काम करीत होते. परंतु, सदर ठेकेदाराने नोव्हेंबर 2021 पासून त्यांना कामावरून काढून टाकले आणि त्या तारखेपासून संबंधित कामगार अत्यंत अडचणीत आलेले आहेत.
व्यवस्थापन आणि ठेकेदार यांनी भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संदीप राऊत यांच्याशी चर्चा करून सर्व कामगारांना कामावर घेण्याचे मान्य केले आणि तसे हमीपत्र ठेकेदार कंपनीने दिले होते. त्यावेळेस कंपनीचे एच.आर.हेड कुणाल आणि ठेकेदार कंपनीचे निखील उपस्थित होते. तरीही कामगारांना कामावर रुजू न केल्याने संतापलेल्या कामगारांनी 2 मार्चपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
हे कामगार भारतीय माथाडी आणि जनरल कामगार सेना युनियनचे सभासद झालेले आहेत आणि त्यांनी युनियनला कळविले आहे, की आम्ही सध्या फार हालाखीचे जीवन जगत आहेत. आमची आणि आमच्या कुटुंबाची उपासमार होत असून, आम्ही सर्व बेरोजगार कामगार कंपनीच्या गेटजवळ दि. 2 मार्च रोजी आमरण उपोषणास बसणार असून, याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीची राहील, असा इशारा पीडित कामगारांनी संजय मोहिते पोलीस महानिरीक्षक कोकण कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.