| आगरदांडा | प्रतिनिधी |
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या जंजिरा उप मंडाळातील विविध स्मारकांवर गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत असणाऱ्या कामगारांचे गेले 5 महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने कामगारांनी नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पुरातत्व विभागाला कामगारांनी केला आहे. या संदर्भात अधिक्षक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई मंडळ व संरक्षण सहाय्यक भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण जंजिरा उप मंडळ यांना रितसर निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या जंजिरा उप मंडाळात असणाऱ्या राजपुरी मुरुड येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला, मुरुड येथील पद्मदुर्ग किल्ला, तळा येथील कुडा मादांड लेणी, तळा फोर्ट, रोहा येथील अवचित गड, महाड येथील खडसरे कांगुरी किल्ला ,पाली येथील खडसामाला स्मारकांवर व अलिबाग येथील कुलाबा किल्ला असे विविध ठिकाणी 26 कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. पंरतु गेल्या पाच महिन्यांपासून ठेकेदाराकडून वेतन मिळत नसल्याने जंजिरा उप मंडाळात चौकशी केली असता ठेकेदाराला बील अदा न केल्याने वेतन दिले नसल्याचे समोर आले. त्यामुळे पुरातत्व विभागाने याकडे लक्ष घालून पाच महिन्यांचा पगार द्यावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे. तसेच जर पगार मिळाला नाही तर जंजिरा उप मंडळातील सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद करतील, असा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे. गेली कित्येक वर्षे कर्मचारी पुरातत्व विभागात कार्यरत असल्याने 1/30 चा दर्जा प्राप्त करुन द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.
ठेकेदाराचा निष्काळजीपणा
ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा ठेकेदारांना कालावधी वाढवून देऊ नये. पुरातत्व विभागाने स्वतः काम घ्यावे. ठेकेदार नेमु नये, अशी मागणी शुभांगी वारगे, प्रसाद वारगे, राहुल कमाने, संतोष बाणकोटकर, सुभाष भोईर, सुरेखा गाणार, विनायक बेडेकर, सुर्यकांत मकु, शाम पवार, रंजना पवार, पांडुरंग कोंडे, पुरवेश चोरगे यांनी केली आहे.
जंजिरा उप मंडाळातील 26 कामगारांचे पगार थकीत आहेत. या संदर्भात ठेकेदाराला त्वरित कामगारांचे पगार काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच कामगारांना पगार दिला जाईल.
बजरंग येलीकर,
सहाय्यक संवर्धक , पुरातत्व संशोधन विभाग