जिल्हा बँकेचे कामकाज आमच्या देशासाठीसुद्धा प्रभावी : प्रा. मकामे एम्बारवा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकार क्षेत्रातील कामकाज हे आज अतिशय उत्कृष्टरित्या चाललेले असून, त्यांनी सादर केलेल्या माहितीप्रमाणे बँकेतील कामकाज हे केवळ भारत देशासाठीच नव्हे तर, आमच्या देशाच्या सहकार क्षेत्रामध्ये प्रभावी ठरेल, असा विश्‍वास टांझानियाचे वाहतूक आणि दळणवळण मंत्री प्राध्यापक मकामे एम्बारवा यांनी व्यक्त केला.

प्राध्यापक मकामे एम्बारवा, टांझानिया प्राधिकरणाचे संचालक प्लॅड्युस एम्बोसा आणि अन्य उच्चाधिकारी यांच्या त्याचप्रमाणे त्यांच्यासमवेत असणार्‍या शिष्टमंडळाने शुक्रवारी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील, तथा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्यासह विविध संचालक आणि अधिकार्‍यांशी चर्चा केली.

अशा प्रकारच्या कामकाजाची अतिशय गरज असून, शेतकर्‍यांसाठी आवश्यक अशा योजना लोकांपर्यंत आज बँकेद्वारे पोहोचवल्या जातात, याबद्दल त्यांनी बँकेचे अभिनंदन केले, शिवाय विशेषतः अलीकडच्या काळामध्ये शेतकर्‍यांना म्हणून योजना परिपूर्णपणे देणे अत्यावश्यक असताना आजच्या काळात बँकेच्या वतीने अशा योजना दिल्या जात असल्याने अशा प्रकारचे मॉडेल आपल्या देशात आणि आफ्रिकन देशांमध्येसुद्धा नेणे हे काळाची गरज ठरेल, असे मत प्रा. मकामे एम्बारवा व्यक्त केले.

अलीकडच्या काळात आफ्रिकन देश मोठ्या प्रमाणावर प्रगती करण्यासाठी उत्सुक असून, त्याप्रमाणे आपले कार्य तत्पर वापरत आहेत. पण, भारतामधील हे तत्त्वज्ञान आणि भारतामधील सहकारी क्षेत्रातील हे उदाहरण आमच्यासाठी मार्गदर्शक नक्कीच ठरेल. शिवाय, बँकेचे चेअरमन आ. जयंत पाटील यांच्या या दूरदृष्टीमुळे आम्हाला रायगड जिल्ह्यातील या बँकेचे कामकाज आणि सहकार क्षेत्रातील विशेषतः शेतकर्‍यांसाठी केलेले कामकाज शिकण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांनी बँकेचे आणि चेअरमन यांचे आभार त्यांनी केले.

Exit mobile version