स्थायी समितीमध्ये कोट्यवधींची कामे मंजुर

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक बैठक शुक्रवारी (दि.8) स्थायी समिती सभागृहामध्ये पार पडली. स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये तब्बल 41 कोटी 7 लाख 36 हजार 373 रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिक्षण आणि कर्मचारी यांचा विचार करून ही कामे मंजूर करण्यात आली.

या सभेमध्ये प्रशासनाच्यावतीने बेलापूर मधील शासकीय इमारत दुरुस्ती बाबत प्रस्ताव आला असता त्यामध्ये संबंधित इमारतीचे नाव नसल्याचे सदस्या सरोज पाटील यांनी निदर्शनास आणले. त्याला सभागृहनेते सागर नाईक यांनी सुद्धा दुजोरा दिला. यावेळेस सभापतींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना येथून पुढे ज्या इमारतीचे काम करणार आहोत, त्याची नावे आणि काय काम करणार आहोत याची ईतंबूत माहिती सभागृहाला सादर करण्याचे आदेश दिले. त्याचवेळी झेरॉक्स आणि स्टेशनरी यासाठी वाढीव आर्थिक तरतूद करण्यात आली. तसेच, बेलापूर आणि नेरूळ विभागातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, पदपथ दुरुस्ती आणि सार्वजनिक गटारची कामे करण्याची मंजुरी देण्यात आली. महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयोगशाळेतील साहित्य खरेदीसाठी भरीव मदतीची तरतूद करण्यात आली.त्याचबरोबर नेरूळ सेक्टर 22 येथील ज्येष्ठ नागरिकांच्या विरुंगुळा केंद्रासाठी 34 लाख 83 हजार रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे नेरूळ मधील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राचा लाभ घेता येईल.

Exit mobile version